अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम कमकुवत; गुणवत्ता चाचणीत माहिती उघड
By मोरेश्वर येरम | Published: December 25, 2020 09:58 AM2020-12-25T09:58:23+5:302020-12-25T10:06:45+5:30
तंत्रज्ञान क्षेत्रात देशातील सर्वोत्तम संस्था असलेल्या आयआयटी, एनआयटी आणि केंद्रीय इमारत संशोधन संस्था (सीबीआरआय) यांच्या मार्गदर्शनाखाली राम मंदिराच्या रचनेवर काम होत आहे.
लखनऊ
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात एक विघ्न निर्माण झालं आहे. वजनाचा भार सहन करण्याच्या अपेक्षित क्षमतेच्या चाचणीमध्ये मंदिराचं बांधकाम नापास ठरलं आहे, अशी माहिती खुद्द श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिली आहे.
बाबरी मशिदीच्या वादग्रस्त प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच संबंधित जागेवर राम मंदिराची उभारणी केली जात आहे. पण बांधकामात त्रृटी समोर आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता या त्रृटी दूर करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधले जात आहेत.
तंत्रज्ञान क्षेत्रात देशातील सर्वोत्तम संस्था असलेल्या आयआयटी, एनआयटी आणि केंद्रीय इमारत संशोधन संस्था (सीबीआरआय) यांच्या मार्गदर्शनाखाली राम मंदिराच्या रचनेवर काम होत आहे. तर 'एल अँड टी', टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स यासारख्या नामवंत कंपन्यांचे इंजिनिअर्स यावर काम करत आहेत.
राम मंदिराच्या प्रस्तावित जागेच्या गर्भगृहाच्या पश्चिमेकडे पाणी वाहू लागल्याने जमिनीची प्रत खालावली असून सैल वाळूसारखी जमीन झाल्याचं संकट इंजिनिअर्ससमोर उभं राहीलं आहे.
मंदीराच्या पायाच्या बांधकामाचे डिझाइन 'एल अँड टी'ने याआधीच सादर केले असून यात जमिनीत २० ते ४० मीटर खोल आणि सुमारे १ मीटर व्यासाचे १२०० सिमेंट काँक्रीटचे पाइल्स उभारले जाणार आहेत.
नेमक्या त्रृटी कशात?
"निश्चित करण्यात आलेल्या आराखड्यानुसार एकूण १२०० खांब जमिनीत उभारले जाणार आहेत. यातील काही खांब जमिनीत १२५ फूट खोल उभारले जाणार आहेत आणि बांधकामाच्या निषकांनुसार याची २८ दिवसांनंतर आम्ही तपासणी केली. भूकंप सदृष परिस्थिती निर्माण करण्यासोबतच खांबांवर ७०० टन वजन ठेवण्यात आले. पण यातून आम्हाला अपेक्षित निकाल हाती लागला नाही. चाचणीत थोडाफार फरक असता तर निभावून नेता आलं असतं पण खूप मोठा फरक जाणवला आहे", असं श्री राम मंदीर जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय म्हणाले.
प्रकल्प व्यवस्थापनाचं स्पष्टीकरण
"केवळ खांब आणि पाइलिंग भार पेलण्यासाठी सक्षम नाही हे आमच्या लक्षात आलं असून इतर पर्यायांचा विचार केला जात आहे", असं प्रकल्प व्यवस्थापक जगदीश अफाळे यांनी सांगितलं.
"मंदीराच्या पायाच्या रचनेबाबत सर्व तंत्रज्ञांसोबत बैठक झाली असून या महिन्या अखेरपर्यंत यावर मार्ग काढला जाईल. त्यानंतर राम मंदीर ट्रस्टसमोर योजना सादर केली जाईल आणि त्यांच्या मंजुरीनंतरच पुढील कामाला सुरुवात होईल. संपूर्ण प्रकल्पाची योजना पूर्णत्वास आल्याशिवाय आम्ही कामाला सुरुवात करू शकत नाही. पुढील किमान हजार वर्षांपर्यंत बांधकाम पक्क राहील अशापद्धतीची योजना आखण्याचं काम अजूनही सुरू आहे", असंही जगदीश म्हणाले आहेत.