राम मंदिर औरंगजेबाच्या राजवटीत पाडले!
By admin | Published: June 20, 2016 05:23 AM2016-06-20T05:23:16+5:302016-06-20T05:23:16+5:30
अयोध्येतील राम मंदिर हे बाबराच्या नव्हे, तर औरंगजेबाच्या राजवटीत पाडले गेले, असा दावा माजी भारतीय प्रशासन सेवेतील (आयपीएस) अधिकारी किशोर कुणाल यांनी केला आहे.
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर हे बाबराच्या नव्हे, तर औरंगजेबाच्या राजवटीत पाडले गेले, असा दावा माजी भारतीय प्रशासन सेवेतील (आयपीएस) अधिकारी किशोर कुणाल यांनी केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभेसाठीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न पुन्हा तापू लागला आहे.
अयोध्येमध्ये बाबरी मशीद उभी राहायच्या आधी रामजन्मभूमी मंदिर अस्तित्वात होते, असे दाखविण्याचा या पुस्तकाने प्रयत्न केला आहे. किशोर कुणाल हे गुजरात केडरचे १९७२ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. मशिदीच्या बांधकामाच्या काळाबाबत कुणाल यांनी नवे प्रतिपादन केले असून, या विषयावर आतापर्यंत असलेल्या समजुती, मते मोडून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कुणाल हे बिहारचे असून ते तेथे पोलीस अधिकारी होते. नंतर ते बिहार धार्मिक विश्वस्तांच्या मंडळाचे प्रशासक आणि अध्यक्ष होते. ते केंद्रीय गृहमंत्रालयात आॅफिसर आॅन स्पेशल ड्यूटी होते आणि अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम जमीनदोस्त होण्याच्या आधी १९९० मध्ये ते अधिकृतपणे अयोध्यावादाशी संबंधित होते. सेवानिवृत्तीनंतर किशोर कुणाल हे दरभंगा येथील केएसडी संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू होते.
पुस्तकात म्हटले आहे की, मंदिर जमीनदोस्त केले जाण्याची घटना ही १५२८ मध्ये (बाबराच्या राजवटीत) घडलेली नाही, तर १६६० मध्ये अयोध्येत औरंगजेबाचा राज्यपाल फेदाई खान असताना घडली आहे. वादग्रस्त जागेवरील कोरीव काम हे बनावट असल्याचे कुणाल कुमार यांनी म्हटले व अनेक इतिहासकारांनी काढलेले निष्कर्षही चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बाबराने अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर पाडण्याचे आदेश दिले हे म्हणणे चुकीचे आहे. बाबराने कधीही अयोध्येला भेट दिली नाही. अवधचा राज्यपाल मिर बाकी याने १५२८ मध्ये बाबरी मशीद बांधून घेतली हा इतिहासकारांचा दावाही काल्पनिक असल्याचे कुणाल यांचा दावा आहे. बाबर ते शाहजहानपर्यंतचे मुगल राजे हे पूर्णपणे उदार होते व त्यांनी सगळ्या धर्मांना आश्रय दिला, असा दावा कुमार यांनी केला आहे. बाबर ते शाहजहानपर्यंतचे चारही मुगल राजे मोठ्या मनाचे आणि उदारमतवादी होते, असे किशोर कुणाल त्यात म्हणतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)