रामविलास पासवानांच्या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 03:03 PM2018-03-19T15:03:28+5:302018-03-19T15:03:28+5:30
रामविलास पासवान हे सतत सत्तेत राहाणारे नेते म्हणून ओळखले जातात.
मुंबई: रालोआचे एक महत्त्वाचे मंत्री म्हणून ओळखले जाणारे रामविलास पासवान यांनी केलेल्या कालच्या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. भारतीय जनता पार्टी आणि रालोआने काँग्रेसप्रमाणे समाजातील सर्व स्तरांमध्य़े जाऊन सर्वसमावेशक धोरण अवलंबले पाहिजे असे विधान त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपाविरोधात राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी विविध नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केल्यानंतर रामविलास पासवान यांनीही सर्व पक्षातील दलित खासदारांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिले. दलित कार्डाचा वापर करुन रामविलास पासवान हे पुन्हा काही नवी खेळी किंवा बदल करु पाहतात का असे प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जाऊ लागले आहेत.
रामविलास पासवान हे सतत सत्तेत राहाणारे नेते म्हणून ओळखले जातात. राजकीय दिशा आणि लोकांची मानसिकता ओळखून राजकीय कंपू बदलणारे नेते अशीही त्यांची ओळख आहे. एच.डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह आणि नरेंद्र मोदी या पाच सलग पंतप्रधानांच्या काळात मंत्रिपदी राहाण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. 1996 पासून आतापर्यंत काही अल्पकाळाचे अपवाद सोडल्यास त्यांच्याकडे रेल्वेमंत्रालयापासून माहिती तंत्रज्ञान खात्यापर्यंत विविध मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता. २००२ साली गुजरात दंगलीनंतर त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २००४ पासून डॉ. मनमोहन सिंह यांच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळवले. २००९मध्ये त्यांच्या पक्षाला सपाटून पराभव पत्करावा लागला.
त्यानंतर काँग्रेसविरोधात आलेल्य़ा मोदी लाटेचा अंदाज घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या निर्णायाचा त्यांना चांगलाच फायदा झाला. रामविलास पासवान, त्यांचा मुलगा चिराग यांच्याबरोबर लोकजनशक्ती पार्टीचे सहा खासदार निवडून आले. आता पुन्हा मोदीलाट ओसरत असल्याचे दिसताच त्यांनी सूचक विधानं करणं सुरु केलं आहे. रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग याने उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला अपयश आल्यानंतरही सूचक ट्वीट केले आहे. पासवान हे राजकीय वातावरणाचा अंदाज घेऊन निर्णय घेणारे नेते आहेत असं मत ट्वीटरवर व्यक्त होत आहे.
RT if you agree Ram Vilas Paswan is the best psephologist in India.
— Tarique Anwer (@tanwer_m) March 18, 2018
I'm surprised Ram Vilas Paswan hasn't jumped ship yet.
— Mohan Sinha (@Mohansinha) March 17, 2018
Ram Vilas Paswan is a person who strongly follows the philosophy of "जिधर बारिश उधर छतरी ". And he can also sense political turmoil in advance. So it is unfair to ignore what he is saying these days.
— Vivek Sharma (@KhamoshVIVEK) March 19, 2018