राम मंदिरासाठी साधूसंत मोदींची भेट घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2015 01:39 AM2015-12-07T01:39:08+5:302015-12-07T01:39:08+5:30
बाबरी मशीद पाडण्यात आल्याच्या घटनेला रविवारी (६ डिसेंबर) २३ वर्षे पूर्ण होत असतानाच अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी साधूसंताचा एक गट लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे
अयोध्या : बाबरी मशीद पाडण्यात आल्याच्या घटनेला रविवारी (६ डिसेंबर) २३ वर्षे पूर्ण होत असतानाच अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी साधूसंताचा एक गट लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. दुसरीकडे इंडियन युनियन मुस्लिम लीगनेही बाबरी मशीद विध्वंसाच्या निषेधार्थ रविवारी धरणा देत, ‘वादा निभाओ-मस्जिद बनाओ’ची मागणी पुढे रेटली आहे. अशा आशयाचे निवेदन लीगने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पंतप्रधानांना सोपवले.
विश्व हिंदू परिषदेचे मुख्यालय कारसेवकपूर येथे आयोजित कार्यक्रमात श्रीरामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांनी वादग्रस्तस्थळी भव्य मंदिर उभारण्यासाठी साधूसंतांचे एक शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधानांना भेटणार असल्याचे सांगितले. मोदींनी भेटीची निश्चित वेळ दिलेली नाही. मात्र साधूसंत त्यांना निश्चित भेटणार असे त्यांनी स्पष्ट केले. याच दरम्यान इंडियन युनियन मुस्लिम लीगचे प्रदेशाध्यक्ष नजमुल हसन गनी यांनी मशीद पुन्हा त्याचजागी उभी राहत नाही, तोपर्यंत प्रत्येक ६ डिसेंबरला निदर्शने होत राहतील, असा इशारा दिला आहे.