संपूर्ण देशात... रामाय तस्मै नम:,भगवान कृष्णाच्या मथुरेतही आनंदोत्सव; अनेक मंदिरांमध्ये भंडारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 08:06 AM2024-01-23T08:06:42+5:302024-01-23T08:08:04+5:30

प्राणप्रतिष्ठेमुळे अवघा देश राममय झाला असून, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Ramaya Tasmai Namah, Lord Krishna's celebration in Mathura too; Bhandara in many temples | संपूर्ण देशात... रामाय तस्मै नम:,भगवान कृष्णाच्या मथुरेतही आनंदोत्सव; अनेक मंदिरांमध्ये भंडारा

संपूर्ण देशात... रामाय तस्मै नम:,भगवान कृष्णाच्या मथुरेतही आनंदोत्सव; अनेक मंदिरांमध्ये भंडारा

500 वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्याने देशभरात स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद देशवासीयांनी साजरा केला. प्राणप्रतिष्ठेमुळे अवघा देश राममय झाला असून, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी फटाके फोडण्यात आले, मिठाई वाटण्यात आली. अनेक मंदिरांमध्ये भंडारा आयोजित करण्यात आला होता.

भगवान कृष्णाच्या मथुरेतही आनंदोत्सव
अयोध्येच्या राम मंदिरातील अभिषेक सोहळा भगवान कृष्णाची जन्मभूमी मथुरेतही उत्साहात साजरा करण्यात आला. सुंदरकांडच्या पठणापासून ते वालुका शिल्पापर्यंत अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. सोहळ्यासाठी ७०० हून अधिक मंदिरे सजवण्यात आली होती. मथुरेतील सर्व प्रमुख चौक, कृष्ण जन्मस्थान मंदिर सजवले गेले आणि शहरातील अनेक भागांमध्ये भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. मंदिर परिसराच्या आतील राधा-कृष्ण मंदिरात, मूर्तींना प्रभू राम आणि सीतेचे स्वरूप देण्यात आले होते, असे श्रीकृष्ण जन्मभूमी सेवा संस्थेचे सचिव कपिल शर्मा यांनी सांगितले.

५१,०००हून अधिक मंदिरांमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन
सोहळ्याच्या निमित्ताने झारखंडमधील ५१,०००हून अधिक मंदिरांमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील मंदिरे फुले, दिवे, ध्वज आणि पोस्टरने सजवण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राजधानीत १,५०० अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ज्या मंदिरांमध्ये भाविकांची जास्त गर्दी होण्याची शक्यता होती, तेथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.

ममतांनी काढली सर्वधर्म रॅली
प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंदिरे, मशिदी, चर्च आणि गुरुद्वारा अशा विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांना भेटी दिल्या आणि धार्मिक सलोखा कायम राखण्यासाठी सर्वधर्म रॅली काढली. या रॅलीमध्ये सर्वधर्मीय लोक हातात हात घालून चालत होते. या रॅलीसाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उत्तर प्रदेश रामरंगात रंगून गेले होते. सिव्हिल लाइन्स येथील हनुमत निकेतन मंदिरात सुंदरकांडाचे आयोजन करण्यात आले होते, तर संपूर्ण माघमेळा परिसरातील भाविकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहिले. भव्य मंदिरात प्रभू राम विराजमान झाल्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. ठिकठिकाणी फटाके फोडण्यात आले, मिठाई वाटण्यात आली. अनेक मंदिरांमध्ये भंडारा आयोजित करण्यात आला होता.

विशेष प्रार्थना आणि रॅलीही काढल्या
अरुणाचल प्रदेशही धार्मिक उत्साहाच्या रंगात रंगला होता आणि ईशान्येकडील राज्यांच्या विविध भागांत विशेष प्रार्थना आणि रॅली काढण्यात आल्या. राज्याच्या राजधानीतील ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी व्यापाऱ्यांनी बाजारपेठा स्वेच्छेने बंद ठेवल्या होत्या. 
सुप्रीम कोर्टाचे 

१३ माजी न्यायमूर्ती उपस्थित
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे तब्बल १३ माजी न्यायमूर्ती उपस्थित होते. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे कार्यालयीन कामामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. या सोहळ्यात माजी सरन्यायाधीश एन.व्ही. रमना, माजी सरन्यायाधीश यू. यू. लळित, माजी सरन्यायाधीश जे.एस. खेहर, माजी सरन्यायाधीश व्ही.एन. खरे, निवृत्त न्यायमूर्ती अशोक भूषण (विद्यमान एनसीएलएटी अध्यक्ष), निवृत्त न्यायमूर्ती अरुण मिश्रा (विद्यमान एनएचआरसी अध्यक्ष), निवृत्त न्यायमूर्ती आदर्श गोयल, व्ही. रामसुब्रमण्यम, अनिल दवे, विनीत सरन, कृष्णा मुरारी, ज्ञान सुधा मिश्रा आणि निवृत्त न्यायमूर्ती मुकुंदकम शर्मा यांचा समावेश होता.

मुलाचे नाव ‘रामरहीम’ ठेवले
फिरोजाबाद : अयोध्येतील राम मंदिरातील अभिषेक सोहळ्याच्या दिवशी सोमवारी येथील एका मुस्लिम महिलेने एका मुलाला जन्म दिला आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत त्याचे नाव ‘रामरहीम’ ठेवले. जिल्हा महिला रुग्णालयाचे प्रभारी डॉक्टर नवीन जैन यांनी सांगितले, “फरजाना या महिलेने सोमवारी एका मुलाला जन्म दिला. मूल आणि आई दोघेही ठीक आहेत. मुलाची आजी हुस्ना बानू यांनी त्याचे नाव ‘रामरहीम’ ठेवले आहे.” हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यासाठी मुलाचे नाव रामरहीम ठेवल्याचे बानू यांनी सांगितले.

सामान्य स्थिती परत येण्यासाठी प्रार्थना
 सोहळ्याच्या निमित्ताने येथील शंकराचार्य मंदिरासह काश्मीर खोऱ्यातील अनेक मंदिरांमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष प्रार्थनेत भाग घेण्यासाठी अल्पसंख्याक हिंदू समुदायातील भाविक आणि पर्यटक येथील जबरवान टेकडीवरील शंकराचार्य मंदिरात पोहोचले. प्रार्थनेनंतर भाविकांना लंगरची सेवा देण्यात आली होती. भक्तांनी काश्मीरमध्ये सामान्य स्थिती परत येण्यासाठी प्रार्थना केली.

Web Title: Ramaya Tasmai Namah, Lord Krishna's celebration in Mathura too; Bhandara in many temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.