रामचरितमानस द्वेष पसरवाणारा ग्रंथ, बिहारच्या शिक्षणमंत्र्यांची मुक्ताफळे, पुढे म्हणाले, या ग्रंथात...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 11:19 PM2023-01-11T23:19:35+5:302023-01-11T23:20:21+5:30
Ramcharitmanas: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानस हा द्वेष पसरवणारा ग्रंथ आहे, असं विधान केलं आहे.
पाटणा - बिहारच्या शिक्षणमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानस हा द्वेष पसरवणारा ग्रंथ आहे, असं विधान केलं आहे. पाटणामध्ये नालंदा मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी रामचरितमानस हा समाजात फूट पाडणारा ग्रंथ असल्याचे म्हटले आहे. आता चंद्रशेखर यांच्या या विधानानंतर राजकारणाला तोंड फुटले आहे.
या वक्तव्याबाबत त्यांना विचारले असता. त्यांनी रामचरितमानस बाबत आपण वापरलेले शब्द योग्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मनुस्मृतीमध्ये समाजातील ८५ टक्के लोकसंख्येच्या मोठ्या गटाविरोधात शिविगाळ करण्यात आली आहे. तसेच रामचरितमानसच्या उत्तरकांडामध्ये कनिष्ठ जातीचे लोक शिक्षण घेतल्यानंतर सापाप्रमाणे विषारी बनतात. हे द्वेष पसरवणारे ग्रंथ आहेत.
ते पुढे म्हणाले की, एका युगामध्ये मनुस्मृती, दुसऱ्या युगामध्ये रामचरितमानस आणि तिसऱ्या युगात गुरू गोळवलकर यांचं बंच ऑफ थॉट्स, हे सर्व देशात, समाजात द्वेष पसरवतात. द्वेष देशाला कधीही महान बनवणार नाही. देशाला महान केवळ प्रेमच बनवेल.
दरम्यान, या विधानावरून आता वादाला तोंड फुटले आहे. चंद्रशेखर यांनी दिलेल्या या विधानावरून भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहजाद पुनावाला यांनी ट्विट केले आहे. बिहारचे शिक्षणमंत्री म्हणतात की, रामचरितमानस हा द्वेष पसरवणारा ग्रंथ आहे. काही दिवसांपूर्वी जगदानंद सिंह यांनी रामजन्मभूमीला द्वेषाची भूमी म्हटलं होतं. हा केवळ योगायोग नाही तर हा व्होट बँकेचा उद्योग आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.