बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा : रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 06:16 PM2019-06-11T18:16:18+5:302019-06-11T18:22:04+5:30
पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी शहा आणि मोदींची भेट घेतल्यानंतर बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची चर्चा सुरु होती.
मुंबई - पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेला हिंसाचाराच्या घटनेमुळे तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची चर्चा सुरु असतानाच, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बंगाल राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या सरकार चालवण्यात अपयशी ठरल्या असल्याचेही आठवले म्हणाले.
बंगालमध्ये कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोज हिंसाचाराच्या घटना घडत आहे. ममता बॅनर्जी बंगालमध्ये हुकुमशाही चालवत आहे. पोलिसांचा वापर करून ममता ह्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. राजकीय वादातून कार्यकर्त्यांचे खून होत आहे, कायदा पायी तुडवला जात आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी शहा आणि मोदींची भेट घेतल्यानंतर बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची चर्चा सुरु होती. त्यावरून ममतांनी भाजपचा समाचार घेतांना म्हणाल्या की, राज्यपाल त्रिपाठी यांचा मी आदर करते, मात्र प्रत्येक पदाची संवैधानिक मर्यादा असते. बंगाल राज्याला दुसरे गुजरात बनवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. मात्र असे मी होऊ देणार नसल्याचेही ममता म्हणाल्या.