मला बी तुमच्या संगं येऊ द्या की! आठवलेंची भाजपला खास साद; नेतृत्त्वाला पत्र लिहून सांगितले फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 10:27 AM2021-06-25T10:27:37+5:302021-06-25T10:29:42+5:30

पुढील वर्षी होत असलेल्या निवडणुका भाजपसोबत लढण्याची रिपाईंची इच्छा; आठवलेंचे जे. पी. नड्डांना पत्र

Ramdas Athawale Urges BJP To Make His Party Ally For UP Punjab Polls | मला बी तुमच्या संगं येऊ द्या की! आठवलेंची भाजपला खास साद; नेतृत्त्वाला पत्र लिहून सांगितले फायदे

मला बी तुमच्या संगं येऊ द्या की! आठवलेंची भाजपला खास साद; नेतृत्त्वाला पत्र लिहून सांगितले फायदे

Next

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा पक्ष उत्तर प्रदेश, पंजाब, मणीपूर, गोवा आणि उत्तराखंडमध्ये होऊ घातलेल्या निवडणुका लढवण्यास उत्सुक आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष म्हणून त्यांना या पाचही राज्यांत निवडणुका लढवायच्या आहेत. याबद्दल रिपाईंचे प्रमुख असलेल्या रामदास आठवलेंनी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहिलं आहे. आता याबद्दल भाजपचं नेतृत्त्व काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलं आहे.

भाजपंन राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विस्तार करून लहान पक्षांना सोबत घ्यायला हवं, असं आठवलेंनी पत्रात म्हटलं आहे. पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा मित्रपक्ष म्हणून जागा लढवण्याची इच्छा त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशात रिपाईं आणि भाजपनं मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यास फायदाच होईल. बहुजन समाज पक्ष आणि रिपाईंचा मतदार सारखाच आहे. दोन्ही पक्षांचा मुख्य जनाधार दलित समाजात आहे. रिपाईं आणि भाजप उत्तर प्रदेशात एकत्र आल्यास दोन्ही पक्षांना दलित मतं मिळतील, असं मतांचं समीकरण आठवलेंनी पत्रात अधोरेखित केलं आहे.

'रिपाईंला सोबत घेतल्यास भाजपचा फायदा होईल. रिपाईंमुळे दलित मतांचं विभाजन होऊ शकतं. त्यामुळे आम्हाला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काही जागा सोडा. त्यासोबतच पंजाब, मणीपूर, गोवा आणि उत्तराखंडमध्येही भाजपसोबत मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची संधी द्या. या सर्वच राज्यांत रिपाईंला काही जागा सोडा, अशी माझी विनंती आहे,' असं आठवलेंनी त्यांच्या पत्रात पुढे म्हटलं आहे.

मणीपूर, गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. इथल्या विधानसभांची मुदत मार्च २०२२ संपेल. तर उत्तर प्रदेशच्या विधासभेचा कालावधी मे महिन्यात संपत आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता आहे. मणीपूरमध्ये भाजप मित्रपक्षांसह सत्तेत आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आहे.

Web Title: Ramdas Athawale Urges BJP To Make His Party Ally For UP Punjab Polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.