नेपाळमधील भूकंपात अनाथ झालेल्या ५०० मुलांना रामदेव बाबा दत्तक घेणार
By admin | Published: April 28, 2015 10:32 AM2015-04-28T10:32:11+5:302015-04-28T11:11:39+5:30
नेपाळमधील मृतांचा आकडा चार हजारच्या वर पोहोचला असून या भूकंपाने अनेक मुलांच्या आईवडिलांनाही हिरावून घेतले आहे. अशा मुलांना आता योगगुरु रामदेव बाबा आधार देणार आहे.
ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. २७ - नेपाळमधील मृतांचा आकडा चार हजारच्या वर पोहोचला असून या भूकंपाने अनेक मुलांच्या आईवडिलांनाही हिरावून घेतले आहे. अशा मुलांना आता योगगुरु रामदेव बाबा आधार देणार आहे. नेपाळ भूकंपात अनाथ झालेल्या सुमारे ५०० बालकांना दत्तक घेणार असल्याची घोषणा रामदेव बाबा यांनी केली आहे.
नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या भूकंपात आत्तापर्यंत ४ हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून हा आकडा १० हजारपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. शनिवारी भूकंप आला त्या दिवशी रामदेव बाबा हेदेखील काठमांडूत शिबीर घेत होते. या भूकंपातून रामदेव बाबा बचावले असून रामदेव बाबांच्या संस्थेचे कार्यकर्ते काठमांडूत मदतकार्य करत आहे. योग शिबीरासाठी बांधलेले तंबू आता मदत शिबीरात बदलले आहेत. याविषयी माहिती देताना रामदेवबाबा म्हणाले, आम्ही नेपाळमधील अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या पालन पोषण व शिक्षणाचा खर्च करणार आहोत. रामदेवबाबा सुमारे ५०० मुलांना दत्तक घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली. या मुलांच्या पाचवी पर्यंतच्या शिक्षणाचा भार रामदेव बाबा उचलतील.