नरेंद्र मोदींच्या आवाहनाला रामदेव बाबांचा प्रतिसाद; स्वदेशी उत्पादनांसाठी 'ऑर्डर मी' लाँच करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 08:44 PM2020-05-15T20:44:40+5:302020-05-15T21:15:50+5:30
पतंजली कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलीने स्वदेशी उत्पादनांसाठी ई कॉमर्स पोर्टल 'ऑर्डर मी' (OrderMe) लाँच करण्याची घोषणा केली आहे. या पोर्टलवर पतंजली व्यतिरिक्त इतर स्वदेशी कंपन्यांच्या उत्पादनांची सुद्धा विक्री केली जाणार आहे. याशिवाय, 'ऑर्डर मी' पोर्टलवरून आयुर्वेदिक उत्पादने विकली जातील. तसेच, आसपासची दुकाने देखील या पोर्टलला जोडली जातील. मात्र, यामध्ये अट अशी असेल की ही दुकाने फक्त स्वदेशी उत्पादने विकतील.
पतंजली कंपनी 'ऑर्डर मी'वर येणाऱ्या ऑर्डरची काही तासांत घरपोच डिलिव्हरी करेल. यासाठी मोबाईल अॅप सुद्धा तयार करण्यात आले आहे. तसेच, या पोर्टलद्वारे पतंजलीचे १५०० डॉक्टर २४ तास लोकांना मोफत वैद्यकीय सल्ला आणि योगाच्या टिप्स देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पतंजली कंपनीचे 'ऑर्डर मी' पोर्टल येत्या 15 दिवसांत लाँच केले जाऊ शकते.
पतंजली कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले 'व्होकल फॉर लोकल' आवाहन लक्षात घेऊन स्वदेशी वस्तूंच्या पुरवठ्यासाठी हे पोर्टल तयार केले जात आहे." दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांसाठी ‘लोकसाठी व्होकल’ ही घोषणा केली आहे. प्रत्येक भारतीयाला लोकलसाठी व्होकल बनायचे आहे. फक्त लोकलसाठी व्होकल बनायचे नाही तर लोकल वस्तूंची खरेदी करायची आहे आणि त्यांचा अभिमान बाळगून प्रचारही करायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
आणखी बातम्या...
CoronaVirus News : आणखी दोन आठवडे लॉकडाऊन वाढवा, 'या' राज्याची केंद्राकडे मागणी
Reliance Jioचा नवीन धमाका, दरदिवशी मिळणार ३ जीबी डेटा...