रामदेव बाबांच्या आटा नूडल्सला परवानगीच्या वादाची फोडणी
By admin | Published: November 18, 2015 09:27 AM2015-11-18T09:27:57+5:302015-11-18T09:43:51+5:30
योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीतर्फे सुरु करण्यात आलेली आटा नूडल्स बाजारपेठेत दाखल होताच वादाच्या भोव-यात सापडली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीतर्फे सुरु करण्यात आलेली आटा नूडल्स बाजारपेठेत दाखल होताच वादाच्या भोव-यात सापडली आहे. आटा नूडल्सला भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाची (FSSAI) अद्याप परवानगी मिळाली नसल्याचे समोर आले आहे.
बाबा रामदेव यांनी सोमवारी गाजावाजा करत आटा नूडल्स लाँच केली. या क्षेत्रातील विदेशी कंपन्यांची एकाधिकारशाही मोडून काढण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला होता. मात्र लाँच होण्याच्या दोन दिवसांनंतरच आटा नूडल्सलाही वादाची फोडणी मिळाली आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार आटा नूडल्सला अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने अद्याप परवानगीच दिलेली नाही. मात्र परवानगी नसतानाही आटा नूडल्सला परवाना क्रमांक कसा दिला गेला हे अद्याप समजू शकलेले नाही. याविषयी एफएसएसएआयचे प्रमुख आशिष बहुगूणा म्हणाले, आटा नूडल्सचे प्रकरण आमच्याकडेही आले आहे. आम्ही अद्याप नूडल्सला परवानगी दिलेली नाही. या प्रकरणाची चौकशी करत आहोत. परवाना देण्याचे काम राज्य सरकारचे असते. पण आम्ही परवानगी दिली नसताना राज्य सरकारने परवाना कसा दिला असा सवाल एफएसएसएआयच्या अधिका-यांनी उपस्थित केला आहे. पतंजलीच्या प्रसिद्धीप्रमुखांनी या तांत्रिकबाबींविषयी आम्हाला काही माहिती नाही. संबंधीत व्यक्तींची चर्चा करुन प्रतिक्रिया देऊ असेे इंडियन एक्सप्रेसला सांगितले.