काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून रामदेवबाबांचा पुन्हा नाराजयोग!
By admin | Published: June 13, 2016 06:23 AM2016-06-13T06:23:12+5:302016-06-13T06:23:12+5:30
काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्रातील मोदी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांवर योगगुरू बाबा रामदेव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
चंदीगड : परदेशात ठेवण्यात आलेला काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्रातील मोदी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांवर योगगुरू बाबा रामदेव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, ‘काळा पैसा परत आणण्यासाठी सरकार पुरेसे प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे मी आणि या देशाची जनता सरकारवर नाराज आहे. या मुद्द्यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशी बोललो आहे.’
गेल्या डिसेंबरमध्येही त्यांनी काळा पैसा परत आणण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नावर नाराजी व्यक्ती केली होती आणि सरकार याबाबत लवकरच ठोस कृती करील, अशी आशा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली. सरकारच्या विकास कार्यक्रमाची आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या धोरणाची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, ‘मोदी सरकारमधील रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मोठे काम करीत आहेत. भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हेही रस्ता प्रकल्पांच्या कामात प्रशंसनीय कार्य करीत आहेत. सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध निश्चित धोरण स्वीकारल्याने भ्रष्ट लोकांविरुद्ध पावले उचलण्यात येत आहेत.’ ‘उडता पंजाब’ या चित्रपटावरून उद्भवलेल्या वादंगाबाबत ते म्हणाले की, ‘आपण हा चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे आपण त्यावर भाष्य करणार नाही. मात्र, देशात अमली द्रव्यांचा व्यापार वाढला असून, तो थांबविला पाहिजे.’ तसेच ते म्हणाले की, ‘लालूजींनी रामदेव यांच्याबद्दल अपशब्द काढणे थांबविले आहे. त्यामुळे काही लोकांना ती बाब पसंत नाही.’ (वृत्तसंस्था)
>दोन वर्षांनंतरही आश्वासन तसेच
यूपीए सरकारच्या काळात काळ्या पैशांसंदर्भात बाबा रामदेव यांनीच आंदोलन छेडले होते. लाखो कोटी रुपये परदेशात असून, भारतात परत आणले जावेत, यासाठी त्यांनी दिल्लीत आंदोलन केले होते. भाजपा सरकार केंद्रात असतानाही काळ्या पैशांची मागणी कायम आहे. भाजपाने निवडणुकीवेळी काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन जवळपास प्रत्येक भाषणातून दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर काळा पैसा परत आल्यास, प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील, असेही आश्वासन दिले होते. मात्र, दोन वर्षांनंतरही याची पूर्तता होऊ शकलेली नाही.