"चेहऱ्यावर मास्क, मफलर, हातात बॅग अन्..."; रेस्टॉरंटच्या मालकिणीने केलं संशयिताचं वर्णन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 03:09 PM2024-03-02T15:09:10+5:302024-03-02T15:14:49+5:30
रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी दुपारी स्फोट झाला, ज्यात दहा जण जखमी झाले.
बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी दुपारी स्फोट झाला, ज्यात दहा जण जखमी झाले. रेस्टॉरंट मालकिणीने दिलेल्या माहितीनुसार, संशयित व्यक्ती बॅग सोडण्यापूर्वी रवा इडली खाताना दिसला होता. रेस्टॉरंटची मालकीण दिव्या राघवेंद्र राव यांनी एनडीटीव्हीशी बोलताना व्हाईटफिल्ड आउटलेटमध्ये स्फोट घडवून आणला त्या दिवशीचा घटनाक्रम सांगितला. "स्फोट झाला तेव्हा माझ्याकडे माझा फोन नव्हता आणि मी फोन उचलला तेव्हा बरेच मिस कॉल्स आले होते. मी माझ्या टीमला फोन केला तेव्हा त्यांनी मला सांगितले की रेस्टॉरंटमध्ये स्फोट झाला आहे."
"सर्वप्रथम मला वाटलं की स्वयंपाकघरात काहीतरी स्फोट झाला असावा, पण नंतर आम्हाला कळलं की स्वयंपाकघरात काहीच झालं नाही आणि स्फोट कस्टमर एरियामध्ये झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मास्क आणि मफलर घातलेला एक व्यक्ती बिलिंग काउंटरवर आला आणि त्याने रवा इडली मागवली. त्याची ऑर्डर घेऊन तो एका कोपऱ्यात जाऊन बसला. खाऊन झाल्यावर तो आपली बॅग तिथेच टाकून रेस्टॉरंटमधून बाहेर पडला आणि काही वेळाने स्फोट झाला."
#WATCH बेंगलुरु के 'द रामेश्वरम कैफे' में जो विस्फोट हुआ वो सीसीटीवी कैमरे में कैद हुआ।
— ANI_HindiNews (@AHindinews) March 1, 2024
(वीडियो सोर्स: पुलिस) pic.twitter.com/VRdkZDVj3V
"चांगली गोष्ट म्हणजे स्फोटाच्या ठिकाणी कोणताही सिलिंडर ठेवण्यात आला नव्हता. माझा व्यवसाय देखील माझ्या मुलाप्रमाणेच आहे आणि माझ्या आउटलेटचं नुकसान झाल्यामुळे मला खूप दुःख झालं आहे. रामेश्वरम कॅफे लवकरच परत सुरू होईल. व्हाईटफील्ड आउटलेट कडक सुरक्षा आणि अधिक सुरक्षा प्रणालींसह पूर्वीच्याप्रमाणेच कार्य करेल. आम्ही परत येऊ."
"रामेश्वरम कॅफे स्फोटात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. यासाठी देवाचे आभार मानते आणि जखमींना मदत करण्यात येत आहे. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, ज्यांना दुखापत झाली आहे ते 15-30 दिवसांत बरे होण्याची शक्यता आहे. त्यांची काळजी घेतली जाईल, जेणेकरून त्यांचे जीवन पुन्हा सामान्य होऊ शकेल" असं दिव्या यांनी सांगितलं आहे.