राणा सांगा यांना 'गद्दार' म्हणणाऱ्या सपा खासदाराच्या घरावर करणी सेनेचा हल्ला, तोडफोड...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 15:19 IST2025-03-26T15:19:26+5:302025-03-26T15:19:57+5:30
Ramjilal Suman on Rana Sanga: राजपूत शासक राणा सांगा यांना गद्दार म्हणणाऱ्या रामजी लाल सुमन यांच्या घरावर करनी सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला.

राणा सांगा यांना 'गद्दार' म्हणणाऱ्या सपा खासदाराच्या घरावर करणी सेनेचा हल्ला, तोडफोड...
Ramjilal Suman on Rana Sanga: काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी संसदेत राणा संगा यांना 'गद्दार' म्हटले होते. त्यांच्या या वादग्रस्त शब्दाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. आज(26 मार्च) करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुमन यांच्या आग्रा येथील घरावर हल्ला केला. करणी सेनेचे कार्यकर्ते बुलडोझर घेऊन सुमन यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी वाहनांची तोडफोड केली.
खासदार रामजीलाल सुमन यांच्या वक्तव्यावर संतप्त झालेल्या करणी सेनेचे हजारो कार्यकर्ते बुधवारी दुपारी त्यांच्या कुबेरपूर येथील निवासस्थानाबाहेर पोहोचले. यावेळी बाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. जमावाने खासदारांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा पोलिसांशी वाद झाला. काही वेळातच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या झटापटीत अनेक पोलीस गंभीर जखमी झाले. सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
#WATCH | Agra, UP: Vandalism and stone pelting broke outside the residence of Samajwadi Party MP Ramji Lal Suman. Police try to disperse the crowd and bring the situation under control.
— ANI (@ANI) March 26, 2025
(Note: Abusive language) pic.twitter.com/ocsKqkgUJD
रामजी लाल सुमन यांच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत. याबाबत विशेषतः राजपूत समाजात नाराजी आहे. मंगळवारी राजपूत संघटनेने भोपाळमधील एसपी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. त्यांनी सपा प्रमुख अखिलेश यादव आणि रामजी लाल सुमन यांच्या पुतळ्यांचे दहन केले. राणा सांगा यांच्याबद्दल पोस्टर लावण्यावरुन महापंचायत आणि सपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली, त्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
काय म्हणाले होते रामजी लाल?
21 मार्च रोजी राज्यसभेत बोलताना रामजी लाल म्हणाले होते की, भारतीय मुस्लिम बाबरला आपला आदर्श मानत नाहीत. ते प्रेषित मुहम्मद आणि सुफी परंपरेचे पालन करतात. पण मला विचारायचे आहे की, बाबरला भारतात कोणी आणले? राणा संगानेच बाबरला इब्राहिम लोदीचा पराभव करण्यासाठी निमंत्रित केले होते, म्हणून जर मुस्लिम हे बाबरचे वंशज आहेत असे म्हटले, तर हिंदू हे देशद्रोही राणा संगाचे वंशज असले पाहिजेत. आम्ही बाबरवर टीका करतो, पण राणा संगावर टीका का करत नाही? असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.
वाद वाढल्यानंतर रामजी लाल काय म्हणाले?
वाद वाढल्यानंतर रामजी लाल सुमन म्हणाले, माझ्या वक्तव्यामुळे समाजातील काही घटकांच्या भावना दुखावल्या आहेत. माझ्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये असा संदेश गेला हे खेदजनक आहे. लोकांच्या भावना दुख्यावण्याचा माझा हेतू नव्हता. मला त्याचा त्रास होतो. मी सर्व जाती, वर्ग आणि समाजाचा पूर्ण आदर करतो.