रामकुंडात पाणी, भाविकांना पर्वणी पालिकेकडून कार्यवाही : कोरड्या पात्राला संजीवनी
By admin | Published: June 10, 2016 10:14 PM2016-06-10T22:14:09+5:302016-06-10T23:02:13+5:30
नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून कोरडेठाक पडलेल्या रामकुंडात महापालिकेने पाणी भरले आणि भाविकांनी घाटावर गर्दी करत स्नानाची पर्वणी साधली. महापालिकेने पात्रात बंधारा टाकत रामकुंडाचा विस्तार कमी केला असून, पाच लाख लिटर्स पाणीसाठवण क्षमतेचे हे पात्र आता कायमस्वरूपी पूर्णपणे भरलेले राहण्यासाठी इंद्रकुंडातून दररोज टॅँकरने पाणी आणून टाकले जाणार आहे.
नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून कोरडेठाक पडलेल्या रामकुंडात महापालिकेने पाणी भरले आणि भाविकांनी घाटावर गर्दी करत स्नानाची पर्वणी साधली. महापालिकेने पात्रात बंधारा टाकत रामकुंडाचा विस्तार कमी केला असून, पाच लाख लिटर्स पाणीसाठवण क्षमतेचे हे पात्र आता कायमस्वरूपी पूर्णपणे भरलेले राहण्यासाठी इंद्रकुंडातून दररोज टॅँकरने पाणी आणून टाकले जाणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गोदापात्र कोरडेठाक पडले आहे. ऐन सिंहस्थ कुंभवर्षात गोदापात्र कोरडे झाल्याने देश-विदेशांतून स्नानासाठी येणार्या भाविकांना निराश मनाने माघारी परतावे लागत होते. दशक्रियाविधीसाठी येणार्या लोकांचीही अस्थिविसर्जनासाठी गैरसोय होत होती. त्यामुळे किमान रामकुंडात पाणी कायमस्वरूपी ठेवण्याची पुरोहित संघासह भाविकवर्गाकडून सातत्याने मागणी केली जात होती. महापौरांनी सणावाराला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता खासगी टॅँकरमालकांना रामकुंडात पाणी आणून टाकण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सुमारे ४५ ते ५० टॅँकरचालकांनी पाणी आणून ओतले होते. परंतु काही दिवसांनी शेवाळयुक्त पाण्याला दुर्गंधी येऊ लागल्याने रामकुंड रिकामे करण्यात आले. रामकुंडाच्या विस्तारित पात्राची सुमारे २० लाख लिटर्स पाणी साठवण क्षमता आहे. शहरात सुरू असलेल्या पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी रामकुंडात सोडणे शक्य नसल्याने महापालिकेने अखेर रामकुंडाचा आकार कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रामकुंडात पाच फूट उंचीचा बंधारा टाकून पाणीसाठवण क्षमता पाच लाख लिटर्सवर आणली. बंधार्याच्या बांधकामामुळे सुमारे महिनाभर रामकुंड कोरडेठाक होते. दरम्यान, रामकुंडात पाणी आणण्यासाठी परिसरात तीन ठिकाणी बोअरवेल खोदण्याचाही प्रस्ताव महापालिकेने समोर आणला होता. परंतु, सदर बोअरवेलला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शविल्याने प्रस्ताव बारगळला. अखेर भाविकांची वाढती मागणी लक्षात घेता महापालिकेने लक्ष्मणकुंडाची साफसफाई करत गुरुवारी रात्री रामकुंडात पंचवटीतील जलकुंभातून सुमारे अडीच लाख लिटर्स पाणी आणून टाकले तर उर्वरित पाणी इंद्रकुंड येथून टॅँकरने आणून ओतण्यात आले. दोन महिन्यांपासून कोरडेठाक पडलेल्या रामकुंडात पाणी भरल्यानंतर भाविकांनी स्नानासाठी गर्दी केल्याने गोदाघाट गजबजला होता.
इन्फो
भाविकांची गैरसोय दूर
सिंहस्थ पर्वकाळाची सांगता ११ ऑगस्ट २०१६ रोजी होणार असून, तोपर्यंत गंगा दशहरा (५ ते १४ जून), शनिप्रदोष (२ जुलै), सोमवती अमावस्या (४ जुलै), देवशयनी एकादशी (१५ जुलै), गुरुपौर्णिमा (१९ जुलै), अमावस्या (२ ऑगस्ट), नागपंचमी (७ ऑगस्ट) आदि तिथी स्नानासाठी आहेत. त्यामुळे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेने रामकुंडात पाणी भरले आहे. आता यापुढे इंद्रकुंडातून रोज टॅँकरने किमान ५० हजार लिटर्स पाणी आणून ओतले जाणार आहे. त्यामुळे रामकुंडातील पाणी स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.
- गुरुमित बग्गा, उपमहापौर
इन्फो
भाविकांमध्ये समाधान
रामकुंड हे महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. त्याचा लौकिक जगभर आहे. त्यामुळे रामकुंड पाण्याने भरलेले राहावे यासाठी पुरोहित संघाने महापालिकेकडे मागणी केली होती. महापालिकेने त्याबाबत कार्यवाही केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या गंगादशहरा महोत्सव सुरू आहे. त्यामुळे भाविकांना स्नानविधी करता येणे शक्य होणार आहे.
- सतीश शुक्ल, अध्यक्ष, पुरोहित संघ
इन्फो
बचत केलेल्या पाण्याचाच वापर
रामकुंडात पाणी भरण्यासाठी जलकुंभातून केवळ अडीच लाख लिटर्स पाणी आणून टाकले आहे. त्यामुळे कुठेही कोणाला पाणीपुरवठा कमी झालेला नाही. महापालिका दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवत असल्याने ३० कोटी लिटर्स पाण्याची बचत होत आहे. त्यातूनच पाणी वापर झालेला आहे. देश-विदेशातून येणार्या भाविकांसाठी रामकुंड पाण्याने भरणे आवश्यकच होते. आता यापुढे इंद्रकुंडातून तसेच खासगी विहिरींतून पाणी टॅँकरने आणून ओतले जाणार आहे.
- उत्तम पवार, अधीक्षक अभियंता, मनपा ---बातमीचा जोड आहे...