कमाल! वयाच्या 11 व्या वर्षी बालविवाह; अभ्यासासाठी घरातून गेला पळून, आता होणार डॉक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 10:42 AM2023-06-21T10:42:42+5:302023-06-21T10:53:16+5:30
मुलाने दहावीनंतर शिक्षण घ्यावं असं वडिलांना वाटत नव्हतं, मात्र मुलाचा पुढे शिक्षण घेण्याचा आग्रह होता.
बालविवाह हे समाजासमोरील एक आव्हान आहे, त्यामुळे अनेकदा मुलांच्या भविष्याची स्वप्नं भंग पावतात. याच दरम्यान एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे, राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यातील घोसुंदा येथे राहणारा रामलाल भोई याने डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी खूप मेहनत केली आहे. रामलालने NEET UG परीक्षा 632 गुणांसह उत्तीर्ण केली आहे. त्याला कॅटेगरी रँक 5137 आणि ऑल इंडिया रँक 12901 मिळाला आहे.
रामलाल भोईने एलन कोटा येथे शिक्षण घेतल्यानंतर NEET क्रॅक केली आहे आणि आता तो कुटुंबातील पहिला डॉक्टर बनणार आहे. रामलालचा वयाच्या 11 व्या वर्षी बालविवाह झाला, जेव्हा तो सहावीत होता. बालविवाहानंतरही त्याने अभ्यास सोडला नाही. पण समाजाच्या जुन्या विचारसरणीमुळे अभ्यास करणं सोपं नव्हतं. मुलाने दहावीनंतर शिक्षण घ्यावं असं वडिलांना वाटत नव्हतं, मात्र मुलाचा पुढे शिक्षण घेण्याचा आग्रह होता. वडिलांनी रामलालला मारहाण केली आणि त्याला अभ्यास करू नको असं सांगितलं. मात्र त्याने आपला अभ्यास चालू ठेवला.
मित्राच्या वडिलांनी येऊन समजावलं, मग रामलालच्या वडिलांनी पुढील अभ्यासात मदत केली. अभ्यासासाठी कुटुंब तयार झाले, कर्ज घेतले आणि शिकवले. मुलानेही कठोर परिश्रम केले आणि शेवटी 5व्या प्रयत्नात NEET उत्तीर्ण केली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. गावातीलच सरकारी शाळेतून 10वी 74 टक्के गुणांसह उत्तीर्ण केली. यानंतर NEET परीक्षेची माहिती मिळाली. तोपर्यंत माहित नव्हते की NEET सारखी परीक्षा देऊन डॉक्टर होतात. त्यानंतर जीवशास्त्र हा विषय घेऊन 11वी आणि 12वी उत्तीर्ण झालो. या काळात मी समाजकल्याण विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या आंबेडकर वसतिगृहात राहायचो, जे मोफत होतं असं रामलालने सांगितलं आहे.
अभ्यासासाठी घरातून गेलेला पळून
जेव्हा NEET तयारीसाठी तो कोटा येथे येऊ लागला तेव्हा लोक म्हणाले, 'अभ्यास करून काय करणार?' आई-वडील दोघेही अशिक्षित आहेत. वडिलांना दहावीनंतर शिकवायचं नव्हतं. यासाठी त्यांनी मला मारहाणही केली, पण मी घरातून पळून उदयपूरला गेलो आणि तिथे प्रवेश घेतला. नंतर मित्राच्या वडिलांनी त्याला समजावलं, नंतर कुटुंबायींना होकार दिला. मी 2019 मध्ये 81 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण झालो असं देखील रामलालने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.