२२ जानेवारीला रामललांची प्राणप्रतिष्ठापना होणार, जुन्या मूर्तीचं काय करणार, मुख्य पुजाऱ्यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 12:15 AM2024-01-20T00:15:36+5:302024-01-20T00:16:40+5:30
Ram Mandir: अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या राम मंदिरामध्ये रामललांचा मूर्ती गर्भगृहात स्थापन करण्यात आली आहे. आता २२ जानेवारी रोजी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या राम मंदिरामध्ये रामललांचा मूर्ती गर्भगृहात स्थापन करण्यात आली आहे. आता २२ जानेवारी रोजी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. मात्र नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर रामललांच्या आतापर्यंत पूजा होत असलेल्या जुन्या मूर्तीचं काय करणार, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आता श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिलं आहे.
आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, रामललांची जी मूर्ती सध्या अस्थायी मंदिरात आहे ती मूर्तीसुद्धा नव्या मंदिरातील गर्भगृहात ठेवण्याच येईल. या मूर्तीची पूजा अनेक वर्षांपासून केली जात आहे. आता नव्या मूर्तीसोबत या मूर्तीची पूजाही केली जाणार आहे. आज संध्याकाळच्या पूजेनंतर जुनी मूर्ती नव्या मंदिरात नेण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठापना पूर्ण झाल्यानंतर भाविकांना दोन्ही मूर्तींची पूजा करता येणार आहे.
राम मंदिरामध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठापना ही २२ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. या प्राणप्रतिष्ठापनेसाठी मंदिर पसिसरात भव्य तयारी करण्यात येत आहे. मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात येत आहे. रामललांची मूर्ती गर्भगृहात विराजमान झालेली आहे. तसेच आता सर्वांना २२ जानेवारीची प्रतीक्षा आहे.
रामललांचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी सांगितले की, जुनी मूर्ती ही खूप लहान आहे. त्यामुळे तिचं दर्शन घेताना भाविकांना खूप अडचणी येतात. सुरक्षेच्या कारणांमुळे मूर्तीचं दूरवरून दर्शन घडवले जाते. आता मोठ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. २२ जानेवारीनंतर प्राणप्रतिष्ठापनेनंतर भाविकांना या दोन्ही मूर्तींचं दर्शन घेता येणार आहे.