32 पायऱ्या चढून होणार रामललाचे दर्शन, तळमजल्याचे 70 टक्के काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 06:03 AM2023-03-20T06:03:10+5:302023-03-20T06:03:25+5:30
मंदिरात चढण्यासाठी २४ पायऱ्या करण्यात आल्या आहेत. मंदिरातील ३२ पायऱ्या चढून भाविक रामललाचे दर्शन घेऊ शकतील.
अयोध्या : श्री रामजन्मभूमीत राम मंदिर उभारणीचे काम सध्या जोरात सुरू आहे. राम मंदिराच्या तळमजल्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. राम मंदिराच्या गर्भगृहात खांब उभारण्यात आले आहेत. मंदिरात चढण्यासाठी २४ पायऱ्या करण्यात आल्या आहेत. मंदिरातील ३२ पायऱ्या चढून भाविक रामललाचे दर्शन घेऊ शकतील.
भिंतींसाठी मकरानाचे पांढरे संगमरवरी खांब
राम मंदिराचे रूप आता दुरूनच दिसण्यास सुरुवात झाली आहे. राम मंदिराच्या गर्भगृहाच्या तीन बाजूंच्या भिंतींचे काम पूर्ण झाले आहे. या २० फूट उंच भिंतींसाठी मकरानाचे पांढरे संगमरवरी खांब बसवण्यात आले आहेत. जानेवारी २०२४च्या तिसऱ्या आठवड्यात मंदिराचे काम पूर्ण होईल, अशी अशा आहे.
२०० बीमचे कोरीव काम पूर्ण
राम मंदिराच्या छताच्या सुमारे दोनशे बीमचे कोरीव काम पूर्ण झाले आहे. रामसेवकपुरम आणि रामघाट येथे असलेल्या कार्यशाळेत हे काम करण्यात आले. कोरलेले दगड रामजन्मभूमी संकुलात नेले जात आहेत.
मोदी करतील रामललाची स्थापना
जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात राम मंदिरात रामलला त्यांच्या मूळ जागेवर विराजमान होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामललाला आपल्या स्थानावर विराजमान करतील, असे सुत्रांनी सांगितले.
डिसेंबरमध्ये सुरू होणार उद्घाटन सोहळा
ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी यांनी सांगितले की, जानेवारी २०२४च्या तिसऱ्या आठवड्यात राम मंदिर भाविकांसाठी खुले केले जाईल. राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा डिसेंबर २०२३ मध्येच सुरू होईल. ऑगस्ट २०२०मध्ये राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर प्रथमच अयोध्या शहरात भव्य रामनवमी उत्सवाचे नियोजन सुरू आहे.
सर्व कामे वेळेत होतील
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा म्हणाले की, गर्भगृहाचे बीम घालण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. मंदिराच्या उभारणीचे काम वेळेच्या अंतिम मुदतीनुसार सुरू आहे. दिलेल्या मुदतीत सर्व कामे पूर्ण होतील.