रामनवमी: सुनसान रस्ते, अयोध्यावासी म्हणाले गेल्यावर्षी पेक्षाही गर्दी कमी; प्रशासन तोंडघशी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 11:20 PM2024-04-17T23:20:07+5:302024-04-17T23:20:47+5:30
Ayodhya Ram Navami: प्राणप्रतिष्ठेवेळी लाखोंच्या संख्येने देशभरातून जथ्थेच्या जथ्थे अयोध्येला रवाना झाले होते. ही गर्दी एवढी होती की उत्तर प्रदेश प्रशासनाला पुढील काही दिवस राम भक्तांनी येऊ नये असे सांगावे लागले होते.
काही महिन्यांपूर्वी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला लाखोंची गर्दी ओसंडली होती. मंदिर प्रशासनाला रात्रंदिवस मंदिर सुरु ठेवावे लागले होते. चेंगराचेंगरी होते की काय एवढी भीषण परिस्थिती होती. यामुळे यंदा रामनवमीला १५ लाखांच्यावर रामभक्त अयोध्येत दर्शनाला येतील असा अंदाज मंदिर प्रशासनाने लावला होता. परंतु, आजच्या दिवशी अयोध्येतील रस्ते ओस पडल्याचे चित्र होते.
राम मंदिराचा प्रभाव आजबाजुच्या राज्यांत पडेल असा राजकीय होरा होता. यामुळेच मंदिराचे काम अर्धवट असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा केली होती. यावेळी लाखोंच्या संख्येने देशभरातून जथ्थेच्या जथ्थे अयोध्येला रवाना झाले होते. ही गर्दी एवढी होती की उत्तर प्रदेश प्रशासनाला पुढील काही दिवस राम भक्तांनी येऊ नये असे सांगावे लागले होते. तसेच ठिकठिकाणी रामभक्तांच्या गाड्या रोखाव्या लागल्या होत्या.
यानंतरची पहिलीच रामजन्मोत्सव असल्याने प्रशासनाने १५ लाख भक्त येणार असल्याचा दावा केला होता. परंतु याच्या उलट घडले आहे. अयोध्येच्या लोकांनी तर गेल्यावर्षीपेक्षा कमी गर्दी यंदाच्या रामनवमीला होती असे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून गर्दी होणारा रामपथ सुनासुना होता. राम मंदिराच्या मुख्य गेटजवळ असलेल्या ११ नंबरच्या गेटवर देखील मंदिरात प्रवेश करणारे भक्त कमी होते.
आलेल्या भक्तांसाठी सात दर्शन रांगांची सोय करण्यात आली होती. यापैकी पाच रांगा रिकाम्या होत्या. रामजन्मोत्सवाच्या दिवशी भक्तांची मोठी गर्दी होत असायची. परंतु यंदाचा रामजन्मोत्सव सुनासुनाच झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. आजच्या दिवशी चांगली विक्री होईल अशा आशेने दुकानदार होते, ते देखील निराश झाले होते असे व्यापारी विजय यादव यांनी सांगितले.