उमेदवारी अर्ज भरण्याआधी आझम खान यांच्या पत्नीला भरावा लागला दंड!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 11:31 AM2019-10-01T11:31:09+5:302019-10-01T11:31:45+5:30
रामपूर प्रशासनाने आझम खान यांच्या हमसफर रिसॉर्टवर धाड टाकली होती.
उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते आणि खासदार आझम खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, यावेळी त्यांची पत्नी आणि राज्यसभा खासदार तंजीन फातिमा यांच्यासंबंधी आहे. तंजीन फातिमा रामपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रिंगणात उतरल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी तंजीन फातिमा यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र, त्याआधी त्यांना 30 लाख रुपयांचा दंड भरावा लागला आहे.
जौहर युनिव्हर्सिटीसंबंधीत जमीन प्रकरणात आझम खान यांचा हात असल्याचा आरोप आहे. तसेच, रामपूर प्रशासनाने आझम खान यांच्या हमसफर रिसॉर्टवर धाड टाकली होती. त्यावेळी वीज चोरी करण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी त्यांची पत्नी तंजीम फातिमा यांच्यावर वीजेची चोरी केल्याप्रकरणी रामपूर प्रशासनाने 30 लाख रुपयांचा दंड आकारला होता. त्यावेळी रिसॉर्टमधील 5 KW च्या मीटरवर जवळपास 33 KW ने लोड होत असल्याचे आढळून आले होते.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील 11 विधानसभेच्या जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची काल (30 सप्टेंबर) अंतिम तारीख होती. त्यामुळे तंजीम फातिमा यांना उमेदवारी अर्ज भरण्याआधी रामपुर प्रशासनाने ठोठावलेला 30 लाख रुपयांचा दंड भरावा लागला.