चतुर्वेदी, गुप्ता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार
By admin | Published: July 30, 2015 04:33 AM2015-07-30T04:33:12+5:302015-07-30T04:33:12+5:30
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या(एम्स) मुख्य दक्षता आयुक्तपदी असताना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड करणारे भारतीय वनसेवेचे (आयएफएस)अधिकारी संजीव चतुर्वेदी
नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या(एम्स) मुख्य दक्षता आयुक्तपदी असताना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड करणारे भारतीय वनसेवेचे (आयएफएस)अधिकारी संजीव चतुर्वेदी आणि ‘गुंज’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अंशू गुप्ता या दोन भारतीयांना आशिया खंडातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ३१ आॅगस्टला फिलिपाईन्सच्या सांस्कृतिक केंद्रात आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
आशियाचा ‘नोबेल’ म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाऊंडेशन (आरएमएएफ)च्या विश्वस्त बोर्डाने बुधवारी या पुरस्काराची घोषणा केली. भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारे एम्सचे विद्यमान उपसचिव संजीव चतुर्वेदी यांची ‘उदयोन्मुख नेतृत्व’ (एमरजेंट लीडरशिप) म्हणून या पुरस्कारासाठी निवड झाली.
‘गुंज’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अंशू गुप्ता यांना त्यांच्या समाजकार्यासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात १९५७ मध्ये झाली होती. फिलिपाईन्सचे तिसरे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. प्रमाणपत्र, दिवंगत राष्ट्रपतींची प्रतिमा असलेले पदक आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अलीकडच्या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, किरण बेदी, अरुणा रॉय आदी भारतीयांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
चतुर्वेदी, गुप्ता या भारतीयांशिवाय लाओचे कोम्माली चांथावोंग, फिलिपाईन्सचे लिगाया फर्नांडे अमिलबांग्सा आणि म्यानमारचे क्याऊ थू यांनाही मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)