रामविलास पासवान यांचा सरकारी बंगला 32 वर्षानंतर रिकामा, पोलीस बळाचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 07:15 AM2022-04-02T07:15:58+5:302022-04-02T07:18:10+5:30
व्ही. पी. सिंह सरकारमध्ये कामगार मंत्री म्हणून १४ मार्च १९९० रोजी त्यांना हा बंगला वाटप करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गेल्या ३२ वर्षांपासून माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना देण्यात आलेला १२ जनपथस्थित सरकारी बंगल्याला आता छावणीचे स्वरूप आले आले. बंगल्याला पोलीस आणि निमलष्करी जवानांनी वेढा दिलेला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सरकारने मालमत्ता विभागाचे पथक आणि पोलीस पाठवून हा बंगला बळजबरीने रिकामा करण्यात आला.
व्ही. पी. सिंह सरकारमध्ये कामगार मंत्री म्हणून १४ मार्च १९९० रोजी त्यांना हा बंगला वाटप करण्यात आला. तेव्हापासून ते याच बंगल्यात राहत होते. ८ ऑक्टोबर २०२० रोजी रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर हा बंगला त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात होता. नोव्हेंबर २०२० पर्यंत पासवान परिवार या बंगल्यात राहू शकले असते. त्यानंतर मात्र त्यांना बाजारभावानुसार घरभाडे आणि वीज-पाणी बिलही द्यावे लागले असते. तथापि, ६ जानेवारी २०२१ रोजी मालमत्ता विभागाने रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांना ६ महिन्यांच्या आत हा बंगला सोडण्यासाठी नोटीस दिली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये हा बंगला केंद्रीय रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना वाटप करण्यात आला.
चार दिवसांत तीन बंगले केले रिकामे...
गेल्या चार दिवसांत सरकारी तीन बंगले बळजोरीने रिकामे करण्यात आले. रामशंकर कठेरिया आणि पी. सी. सारंगी या दोन माजी मंत्र्यांचेही बंगले पोलीस पथक पाठवून रिकामे करण्यात आले. चिराग पासवान यांनी म्हटले की, कायमचा या बंगल्यात राहणार नव्हतो. ज्या पद्धतीने बंगल्यातून आमच्या कुटुंबीयांना बाहेर काढण्यात आले, त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.