माजी सैनिकाचा मृत्यू; 42 km धावले, 180 km सायकल चालवली अन् मृत्यूने कवटाळले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 09:08 PM2023-02-26T21:08:43+5:302023-02-26T21:13:15+5:30
ओडिशातील पुरी जिल्ह्यात आयोजित ट्रायथलॉनमध्ये माजी सैनिकाचा मृ्त्यू झाला.
ओडिशात पुरी जिल्ह्यातील रामचंडी भागात सुरू असलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या एका माजी सैनिकाचा मृत्यू झाला. त्यांना छातीत अचानक त्रास सुरू झाला, यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासाअंती त्यांना मृत घोषित करण्यात आले. नितीन सोनी असे मृताचे नाव असून ते राजस्थानमधील जोधपूरचे रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील पुरी जिल्ह्यातील रामचंडी भागात सुरू असलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नितीन सोनी गेले होते. 42 वर्षीय नितीन सोनीने बंगालच्या उपसागरात 3.8 किमी पोहून 42 किमी धावून नंतर 180 किमी सायकलही चालवली. स्पर्धा संपताच त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. यानंतर त्यांना कोणार्क रुग्णालयात नेण्यात आले. येथून पुरी मेडिकल हॉस्पिटलला रेफर करण्यात आले, मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पुरी पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी नैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. नितीनच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. नितीनचा मृतदेह घेण्यासाठी मृताचा मोठा भाऊ जोधपूरहून भुवनेश्वरला आला. नितीन विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. नितीनचे वडील जयपूरमध्ये राहतात आणि ते बाडमेर मेडिकल कॉलेजचे प्राचार्य राहिले आहेत. नितीन सोनी यांनी लष्करात कॅप्टन म्हणून काम केले होते आणि 2007 साली निवृत्ती घेतली होती.