झारखंडमध्ये आज शक्तीपरीक्षा, चंपाई सरकार बहुमत सिद्ध करणार का? जाणून घ्या, गणित...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 09:14 AM2024-02-05T09:14:52+5:302024-02-05T09:15:40+5:30
माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील फ्लोर टेस्टमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
झारखंडमधील राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. चंपाई सरकार आज विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहे. फ्लोअर टेस्टमध्ये (floor test) सहभागी होण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) आणि आघाडीतील जवळपास ४० आमदार हैदराबादहून रांचीला परतले आहेत. तत्पूर्वी, सर्व आमदारांना हैदराबादजवळील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते, तेथून ते सर्व रात्री उशिरा रांचीला परतले आहेत.
माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील फ्लोर टेस्टमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. ८१ सदस्यीय झारखंड विधानसभेत बहुमताचा आकडा ४१ आहे. आघाडीचा विचार केला तर चंपाई सरकारकडे या किमान बहुमताच्या आकड्यापेक्षा पाच अधिक आमदार आहेत. विधानसभेच्या ८१ जागांपैकी एक जागा रिक्त आहे, त्यामुळे ८० जागांची मोजणी केल्यानंतर बहुमताचा आकडा ४१ आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाने दावा केला आहे की, त्यांच्याकडे पुरेशी संख्या आहे. फ्लोर टेस्टमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. दरम्यान, विधानसभेत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (ML) एकूण ४६ आमदार आहेत. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे २८, काँग्रेसचे १६, आरजेडीचा एक आणि सीपीआय (एमएल)च्या एका आमदारांचा समावेश आहे. विरोधी पक्ष भाजपा आणि मित्रपक्षांकडे एकूण २९ आमदार आहेत.
जर कोणतेही मोठी उलथापालथ झाली नाही, तर चंपाई सरकार विधानसभेच्या पटलावर बरेच काही सिद्ध करण्यात यशस्वी होईल, असे जाणकारांचे मत आहे. दुसरीकडे, झारखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमरकुमार बौरी म्हणाले की, राज्यातील प्रशासन त्यांच्या हातात आहे, तरीही आमदारांना कैद्यांप्रमाणे हैदराबादला नेण्यात आले आणि कोंडून ठेवण्यात आले. यावरून त्यांच्यात समस्या असल्याचे स्पष्ट होते. झारखंडच्या भल्यासाठी आपल्या सदसद्विवेकबुद्धीचे ऐकून कोणाला काही चांगले करायचे असेल तर भाजपा त्याचे स्वागत करेल.
हेमंत सोरेन यांनी ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात काही राजकीय नाट्यमय घडामोडी सुरु होत्या. त्याच गडबडीत चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आले. दरम्यान, जेएमएमला फ्लोर टेस्टला सामोरे जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. सप्टेंबर २०२२ मध्ये, हेमंत सोरेन यांच्या सरकारने फ्लोअर टेस्टमध्ये आपल्या बाजूने ४८ मतांसह बहुमत सिद्ध केले होते. त्यावेळी हेमंत सोरेन यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून विधानसभेतून अपात्र ठरवले जाण्याचा धोका होता.
हेमंत सोरेन यांच्यावर काय आरोप?
ईडीने हेमंत सोरेन यांच्यावर केलेल्या कारवाईच्या समर्थनार्थ अनेक दावे केले आहेत. ईडीने दावा केला आहे की, हेमंत सोरेन यांच्याकडे रांचीमध्ये सुमारे ८.५ एकरचे १२ भूखंड बेकायदेशीरपणे ताब्यात आणि वापरात आहेत. मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत गुन्ह्यातून मिळालेले हे उत्पन्न आहे. या प्रकरणात मनी लाँड्रिंग करण्यात आले आहे. त्यांनी चुकीच्या मार्गाने पैसे कमवले आहेत.