हृदयस्पर्शी! इस्रायल-हमास युद्धात अडकली 'झारखंडची लेक'; आई-वडिलांना काळजी, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 02:45 PM2023-10-12T14:45:37+5:302023-10-12T14:47:26+5:30
Israel Palestine Conflict : रांची येथील विनिता घोष ही तरुणी इस्रायल-हमास युद्धात अडकल्याने तिचं कुटुंब काळजीत आहे. आपल्या मुलीच्या सुखरूप परतण्यासाठी पालक नेत्यांकडे जात आहेत.
झारखंडच्या रांची येथील विनिता घोष ही तरुणी इस्रायल-हमास युद्धात अडकल्याने तिचं कुटुंब काळजीत आहे. आपल्या मुलीच्या सुखरूप परतण्यासाठी पालक नेत्यांकडे जात आहेत. दुसरीकडे इस्रायलचे लोक विनीताला खूप मदत करत आहेत आणि त्यांनी तिथून भारतात येण्यासाठी तिची तिकिटाचीही व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर इस्रायलमध्ये अडकलेल्या 18 हजार भारतीयांची सुखरूप सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन अजय सुरू केल्याची माहिती मिळाल्याने कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
विनिता तेल अवीवमध्ये असून सध्या ती तिथे सुरक्षित आहे. मात्र, तरीही रोज सकाळ-संध्याकाळ हल्ले होत असल्याचे विनीता सांगते. तेल अवीववर क्षेपणास्त्रे आणि रॉकेट डागले जात असल्याने सायरनचे आवाज ऐकू येत आहेत. विनीता सांगते की, इस्रायलचे लोक मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहेत. विनिता तेल अवीव विद्यापीठात पीएचडी करत आहे. रांचीमध्ये राहणारे तिचे आई-वडील आपली मुलगी युद्धात अडकल्यामुळे खूप चिंतेत आहेत. तेथून मुलीला सुखरूप बाहेर काढता यावे, यासाठी वडील विश्वजित घोष नेत्यांकडे जात आहेत.
विश्वजित घोष यांनी सांगितलं की, ती 2022 मध्ये पीएचडी करण्यासाठी इस्रायलला गेली होती. तिला अजून अभ्यास पूर्ण करायचा आहे, पण युद्धासारखी परिस्थिती लक्षात घेऊन ती तिथून येत आहे. तथापि, भारत सरकार देखील इस्रायलमधून लोकांना एअरलिफ्ट करण्यास सुरुवात करत आहे, परंतु विनीताचे तिकीट आधीच बुक केले गेले आहे आणि 13 ऑक्टोबर रोजी ती इस्रायलहून दुबईसाठी रवाना होईल आणि नंतर भारतात पोहोचेल. इस्रायलच्या लोकांनी विनीता यांना याबाबत खूप मदत केली.
विनीताची आई आपल्या मुलीचा फोटो बघताना दिसली, पण मुलीचा फोटो पाहताना त्यांचे डोळे भरून आले. आईची एकच इच्छा आहे ती म्हणजे आपली मुलगी सुखरूप घरी यावी. विनीता घोषने फोनवर बोलचताना इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाविषयी आणि इस्रायलच्या लोकांबद्दलच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. इस्रायलचे लोक मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहेत. अशा परिस्थितीतही लोक आपलं काम चोखपणे पार पाडत आहेत असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.