रस्त्यावर रंगला अपहरणाचा थरार, पोलिसांनीही फिल्मी स्टाइलने केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 07:29 AM2022-01-25T07:29:37+5:302022-01-25T07:30:11+5:30
टोळी युद्धातून प्रतिस्पर्धी ‘चॉकलेट’चे अपहरण : पोलिसांनीही फिल्मी स्टाइलने केली सुटका
मनीषा म्हात्रे
मुंबई : पोलिसांनी तडीपार केलेल्या आरोपीला आपल्या प्रेयसीला भेटण्याचा मोह जिवावर बेतला असता. मात्र, केवळ नशीब बलवत्तर म्हणून पोलीस वेळेवर पोहोचले आणि या आरोपी तरुणाचा जीव वाचला. रविवारी रात्री मुंबईतील अँटॉप हिल ते घोडपदेव या रस्त्यावर माफिया टोळीने प्रतिस्पर्धी चॉकलेट नावाने प्रसिद्ध असलेल्या सिद्धार्थ भोसले नावाच्या तरुणाच्या केलेल्या या अपहरणाचा थरार घडला. पोलिसांनीही फिल्मी स्टाइलने जिवाची बाजी लावून अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली. सध्या त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अँटॉप हिल परिसरात राहणारा सिद्धेश भोसले हा पोलीस अभिलेखवरील गुन्हेगार आहे. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला तडीपार केले आहे. रविवारी काळोख पडताच त्याने प्रेयसीला भेटण्यासाठी मुंबईत प्रवेश केला. तो प्रेयसीला माटुंगा परिसरात भेटायला आला. नेमक्या त्याच क्षणी माटुंगाच्या लक्ष्मी नापू रोड येथील बुलेट इमारतीजवळ वाहनातून आलेल्या चौकडीने त्याला अडवून मारहाण सुरू केली. दुसरीकडे प्रेयसी मदतीसाठी याचना करीत होती. यावेळी तेथून जाणाऱ्या दोन पोलिसांनी त्याला वाहनात ढकलत असल्याचे पाहून त्यांच्याकडे धाव घेतली; पण तोपर्यंत ते तेथून निघून गेले. पोलीस उपायुक्त वियज पाटील यांनी तत्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, माटुंगा, सायन, तसेच अँटॉप हिल पोलीस ठाण्यातील विविध पथकांनी शोध सुरू केला.
प्रेयसीच्या चौकशीतून तो आरोपी चॉकलेट असल्याचे समजताच पोलिसांनी त्याच्या विरोधकांची माहिती घेण्यास सुरुवात केली. माटुंगा पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी संदीप अहीरराव, भरत गुरव यांना सीसीटीव्हीच्या मदतीने त्याचे अपहरण केलेले वाहन वडाळा टी टीच्या दिशेने जाताना दिसले.
दुसरीकडे, अँटॉप हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन झाडे, सहायक फौजदार बबन जाधव आणि अंमलदारांनी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासत, खबऱ्यामार्फत शोध सुरू केला. त्यातून त्यास घोडपदेव येथील एका सिमेंटच्या गोदामात नेल्याचे समजले. दोन ते अडीच तासांच्या शोध मोहिमेनंतर एका गोदामात त्याला मारहाण करताना चौकडी दिसली. यावेळी पोलिसांसोबत त्यांची झटापट झाली. मात्र, पोलिसांनी जिवाची बाजी लावत अर्धमेला झालेल्या भोसलेची सुटका करीत प्रफुल्ल पाटकरला अटक केली, तर तिघे जण पसार झाले.
मुंबईतल्या नामांकित महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत असताना जखमी तरुण आणि आरोपीमध्ये घट्ट मैत्री होती. मात्र, यातच एकाच्या बहिणीसोबत अश्लील कृत्य केल्याच्या घटनेनंतर त्यांच्यात दोन गट पडले. एक गट काळाचौकी आणि दुसरा अँटॉप हिलमधील आहे.
दीड वर्षापासून वाद सुरू झाला. गेल्या वर्षी मे महिन्यात भोसलेचा मित्र हितेश नागडे तरुणावर नागेश चव्हाण, विजय काकडे, मंदार रांजनकर, प्रफुुुल्ल पाटकर टोळीने हल्ला चढवला. यामध्ये त्याची ३ बोटे तुटली. यामध्ये पाटकर आणि रांजनकर नुकतेच जामिनावर बाहेर आले.
मात्र, काकडे आणि चव्हाण यांना जामीन मिळत नसल्याने त्यांच्या वादात भर पडली. घटनेच्या आदल्या दिवशीही त्यांच्यात वाद झाला. मात्र, ते प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले नाही. यातूनच त्यांनी हल्ला चढवला.