पाकच्या रेंजर्सकडून रात्रभर तोफांचा मारा
By admin | Published: October 27, 2016 02:47 AM2016-10-27T02:47:37+5:302016-10-27T02:47:37+5:30
पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रबंदीचे उल्लंघन करीत जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या आर.एस. पुरा भागात मंगळवारी रात्रभर उखळी तोफांच्या भडिमारासह गोळीबार केला.
जम्मू : पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रबंदीचे उल्लंघन करीत जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या आर.एस. पुरा भागात मंगळवारी रात्रभर उखळी तोफांच्या भडिमारासह गोळीबार केला. पाकिस्तानच्या बाजूने डागलेल्या तोफगोळ्याचा स्फोटात सीमा सुरक्षा दलाचा एक अधिकारी जखमी झाला असून, गेल्या चोवीस तासांपासून या भागात सीमेपलीकडून करण्यात आलेल्या सीमापार गोळीबारात तीन मुलींसह दहा महिला जखमी झाल्या आहेत.
सीमेपलीकडून रात्रभर उखळी तोफांचा मारा आणि गोळीबाराच्या फैऱ्यांनी अनेक गावे ओसाड पडली आहेत. जीव मुठीत धरून दोन रात्री काढणाऱ्या या सीमावर्ती अनेक गावांतील भयभीत रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी मुक्काम हलविण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानी रेंजर्सनी डागलेला तोफगोळ्याचा सीमा सुरक्षा दलाचे सहायक उपनिरीक्षक ए.के. उपाध्याय यांच्या जवळच स्फोट झाल्याने ते जखमी झाले. पाकिस्तानी रेंजर्सनी उखळी तोफांसह रात्रभर आर.एस. पुरा भागात गोळीबार केला, असे सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. पाकिस्तानी रेंजर्सच्या माऱ्याला सीमा सुरक्षा दलाकडून चोख उत्तर दिले जात आहे. आर.एस. पुरा विभागातील अनेक भागांत अजूनही अधूनमधून गोळीबार होत आहे. पाकिस्तानी रेंजर्सनेही मंगळवारी रात्री १.३० वाजता साई कलान बुरे जाल, त्रेवा आणि अर्निया या नागरी वस्तींनासुद्धा लक्ष्य केले. जिवाच्या भीतीने या वस्तीतील लोक घरात होते. त्यामुळे जीवित हानी झाली नाही. (वृत्तसंस्था)
चिथावणीखोर चौघांना अटक...
काश्मीरमधील अशांत स्थिती आणखी भडकाविणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानस्थित तेहरिक- इ- जेहाद- इ- इस्लामिकच्या संघटनेच्या दोघांना बारामुल्लात अटक करण्यात आली. पाकिस्तान भेटीत या दोघांना सोपोर भागात अशांतता पसरविण्यासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले.
पाक प्रसारमाध्यमांत सरकारवर जोरदार टीका
‘चांगले दहशतवादी, वाईट दहशतवादी’ हे पाक सरकारचे धोरण दुबळे व धोकादायक असल्याची कठोर टीका पाकिस्तानी वृत्तपत्रांच्या संपादकीयांत करण्यात आली आहे. याच धोरणामुळे क्वेट्टामध्ये मंगळवारी भीषण दहशतवादी झाला, असा ठपका त्यात ठेवण्यात आला आहे. या हल्ल्यांत ६१ जण ठार तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले.
पाकिस्तानने एक तर दहशतवादाविरोधात, सगळ््या दहशतवादाविरोधात लढावे किंवा
लढू नये. अधवट उपचार उपयोगाचा नाही. कोणालाही विशेष पसंती नाही. चांगले दहशतवादी, वाईट दहशतवादी, असे काही नाही. क्वेट्टामध्ये झालेला हल्ला व देशाच्या मोठ्या भागातील हल्ले हे मूलभूत धोरणाच्या अपयशामुळे झाले असून एकूण व्यवस्था व वेगवेगळ््या प्रकारच्या राजकीय नेत्यांना एकच प्रश्न समजून घेता आलेला नाही, असे ‘द एक्स्प्रेस ट्रिब्युन’ने संपादकीयात म्हटले.
पाकने हातभार लावावा... पाकिस्तान आपल्याच देशातील पण शेजारच्या देशावर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करून विभागीय स्थैर्याला हातभार लावू शकते, असे अमेरिकेने म्हटले आहे. शेजारी देशावर हल्ला करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करून पाकिस्तान स्थैर्याला प्रत्यक्ष हातभार लावू शकते, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी येथे बोलून दाखवले.