मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच खंडणी वसुली, लोकसभेत नवनीत कौर आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 01:15 PM2021-03-22T13:15:55+5:302021-03-22T16:17:06+5:30
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर(Prakash Javdekar) यांनी राज्यसभेत तर भाजपाचे खासदार राकेश सिंह यांनी लोकसभेत (Loksabha) हा मुद्दा उचलला आहे
नवी दिल्ली - परमबीर सिंग यांच्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्रात उठलेले वादळ आता देशाच्या संसदेत घोंगावत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) ज्या पक्षाचे आहेत त्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) सदस्य असलेल्या राज्यसभेत (Rajya sabha) मोठा गदारोळ उडाला असून राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. तर, लोकसभेतही अनेक खासदारांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. भाजपा खासदार गिरीश बापट आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. कौर यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत चौकशीची मागणी केलीय.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर(Prakash Javdekar) यांनी राज्यसभेत तर भाजपाचे खासदार राकेश सिंह यांनी लोकसभेत (Loksabha) हा मुद्दा उचलला आहे. जावडेकर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री वसुली करतात हे साऱ्या देशाने पाहिल्याचा आरोप केला आहे. यामुळे राज्यसभेत गदारोळ उठल्याने राज्यसभेच्या सभापतींनी हे काहीही रेकॉर्डवर घेतले जाणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर, याप्रकरणी लोकसभेतही गोंधळ उडाल्याचे दिसून आले.
On what basis was a man suspended for 16 yrs & jailed, reinstated? When there was BJP govt, Uddhav Thackeray himself had called up Devendra Fadnavis for reinstating Sachin Waze, Fadnavis had refused. When Thackeray govt came, they reinstated him: Independent MP Navneet Ravi Rana pic.twitter.com/AULrHbDIe5
— ANI (@ANI) March 22, 2021
अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत गुन्हेगार खंडणी मागत होते. आज, पोलीस खंडणी मागत आहेत, गृहमंत्री खंडणी मागायला लागले आहेत. कुंपनच शेत घातंय, पाण्याला तहान लागलीय. त्यामुळे, महाराष्ट्रात राष्टपती राजवट लागू करावी, अशी मागणी भाजपा नेते आणि खासदार गिरीष बापट यांनी लोकसभेत केली. महाराष्ट्रात कायद व सुव्यवस्था राहिली नाही. खंडणी मागणाऱ्या पोलिसांना मंत्र्यांचा आशीर्वीद आहे, मुख्यमंत्र्यांचा आशीर्वीद आहे, असेही ते म्हणाले. त्यानंतर, खासदार नवनीत कौर यांनीही या अतिशय गंभीर मुद्दा असल्याचे म्हटले.
खासदार नवनीत राणा यांनीही महाराष्ट्रातील 100 कोटींच्या हफ्ता वसुलीच्या मुद्दयावरुन आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. जो व्यक्ती 16 वर्षे निलंबित होता, जो व्यक्ती 2 वर्षे तुरुंगात होता, त्या व्यक्तीला पुन्हा सेवेत सामावून घेतलंचं कसं? असा प्रश्न नवनीत कौर यांनी विचारला. भाजपा-शिवसेनेच्या सरकारमध्ये सचिन वाझेला सेवेत घेण्यास तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला होता. मात्र, महाराष्ट्रात ठाकरे सरकार येताच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेला सेवेत घेण्याचे निर्देश परमबीर सिंग यांना दिले. याप्रकरणी आता गृहमंत्र्यांना नाव पुढे आलंय, देशात अशाचप्रकारे खंडणी वसुलीच्या घटना घडतील. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच ही खंडणी वसुल केली जात आहे. केवळ मुंबईतच 100 कोटींची हफ्ता वसुली होत असेल, तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती कोटींची खंडणी वसुली होतेय? असा सवालही कौर यांनी विचारला.