रणथंबोरला ६५ कोटींचे उत्पन्न देणारी ‘मछली’ गेली!
By admin | Published: August 19, 2016 05:27 AM2016-08-19T05:27:31+5:302016-08-19T05:27:31+5:30
जिवंत दंतकथा बनलेली रणथंबोर अभयारण्यातील वाघीण ‘मछली’ने गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. ती जगातील सर्वाधिक वयाची जंगली वाघीण होती. दीर्घ काळापासून आजारी
जयपूर : जिवंत दंतकथा बनलेली रणथंबोर अभयारण्यातील वाघीण ‘मछली’ने गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. ती जगातील सर्वाधिक वयाची जंगली वाघीण होती. दीर्घ काळापासून आजारी असलेल्या राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील रणथंबोरमधील मछलीने गेल्या पाच दिवसांपासून अन्न वर्ज्य केले होते.
मृत्युसमयी ती १९ वर्षांची होती. वाघांचे सरासरी आयुर्मान १४ ते १५ वर्षे आहे. मछलीमुळे गेल्या दहा वर्षांपासून रणथंबोर अभयारण्याला दरवर्षी ६५ कोटी रुपयांचा पर्यटन महसूल मिळत होता.
नाव असे का?
या वाघिणीला मछली हे नाव तिच्या चेहऱ्यावरील खुणेमुळे मिळाले होते. ही खूण माशासारखी दिसत असल्यामुळे सर्व जण तिला मछली म्हणत. तथापि, टी-१६ या नावानेही ती ओळखली जाई.
लोकप्रिय राणी : जगात सर्वाधिक छायाचित्रण झालेली ती पहिली जंगली वाघीण होती. ती एवढी लोकप्रिय झाली होती की, तिच्यावर टपाल तिकीट काढण्यासह अनेक माहितीपटांची निर्मितीही करण्यात आली. फेसबुकवर तिला वाहिलेली अनेक पाने असून, वन्यजीवप्रेमी याच पानांच्या माध्यमातून तिच्या हालचालींचा मागोवा घेत असत.
पाच दिवसांपासून होती आजारी
मछली अमा घाटी परिसरात पाच दिवसांपूर्वी आजारी अवस्थेत आढळून आली होती. तिच्या सभोवतीच्या परिसर सुरक्षित करून वन कर्मचारी तिला मांस भरविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, तिची प्रकृती सुधारली नाही. गुरुवारी सकाळी ९ वाजून ५२ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.
काही वर्षांपूर्वी मगरीसोबत झालेल्या लढाईत मछलीने तिचे सर्व सुळे गमावले होते. ती जिवंत राहावी यासाठी तिला माशांचे खाद्य दिले जात होते. वनरक्षकांची एक समर्पित तुकडी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवत असे.