रणवीर अलाहाबादिया अडचणीत, सर्वोच्च न्यायालयाकडे केली मागणी; सरन्यायाधीश म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 14:02 IST2025-02-14T14:01:05+5:302025-02-14T14:02:49+5:30
समय रैनाच्या शोमध्ये वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आलेल्या रणवीर अलाहाबादियाने आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

रणवीर अलाहाबादिया अडचणीत, सर्वोच्च न्यायालयाकडे केली मागणी; सरन्यायाधीश म्हणाले...
Ranveer Allahbadia Supreme Court: इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये अश्लाघ्य टिप्पणी केल्यामुळे रणवीर अलाहाबादिया अडचणीत सापडला आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. रणवीर अलाहाबादियानेचसर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. रणवीरने जामिनासाठी याचिका दाखल केली असूनही इतर मागण्याही याचिकेत करण्यात आल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रणवीर अलाहाबादियाविरोधात महाराष्ट्रासह इतर राज्यातही गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे रणवीरने अटक पूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रणवीर अलाहाबादियाचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे तातडीने सुनावणी करण्याची मागणी केली.
सर्वोच्च न्यायालयात काय झाले?
रणवीरचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी वेगवेगळ्या राज्यात दाखल झालेले गुन्हे एकत्र करून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे केली.
सरन्यायाधीश खन्ना यांनी रणवीर अलाहाबादियाच्या याचिकेवर सुनावणी घेण्याबद्दलची तारीक देण्यास नकार दिला. याचिका मेन्शन करण्याची गरज नाही, असेही सरन्यायाधीश म्हणाले.
रणवीर अलाहाबादियाचे वकील अभिनव चंद्रचूड यांना सरन्यायाधीश खन्ना म्हणाले, मौखिक स्वरूपात तातडीने सुनावणी करण्याच्या मागणीवर विचार केला जाणार नाही. आधी तुम्ही रजिस्टारकडे जा, असे खन्ना म्हणाले.
रणवीरला मुंबई पोलिसांचे दुसऱ्यांदा समन्स
वादग्रस्त विधानाप्रकरणी मुंबई पोलिसांनी रणवीर अलाहाबादियाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांनी समन्स बजावले होते. गुरुवारी रणवीर अलाहाबादियाला पोलीस ठाण्यात जबाब नोंदवायचा होता. पण, तो आला नाही. त्याला दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आले आहे. रणवीरला खार पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
समय रैना अजूनही अमेरिकेत
पोलिसांनी समय रैना यालाही समन्स बजावलेले आहे. पण, समय रैना अमेरिकेत असून, त्याने हजर होण्यासाठी पोलिसांकडे वेळ मागितला आहे. मुंबई पोलिसांनी समय रैनाला आधी १७ फेब्रुवारी रोजी जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले होते. आता त्याला १८ फेब्रुवारी रोजी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावले आहे.