‘ईव्हीएम’वरून दिल्लीत रणकंदन
By admin | Published: May 10, 2017 01:11 AM2017-05-10T01:11:26+5:302017-05-10T01:11:26+5:30
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) कसा बदल केला जाऊ शकतो याच्या प्रत्येक टप्प्याचे प्रात्यक्षिक मंगळवारी आम आदमी पक्षाने
नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) कसा बदल केला जाऊ शकतो याच्या प्रत्येक टप्प्याचे प्रात्यक्षिक मंगळवारी आम आदमी पक्षाने (आप) दिल्ली विधानसभेच्या एक दिवसाच्या विशेष अधिवेशनात करून दाखवले. अशा ईव्हीएमचा लोकशाहीला धोका आहे, असेही म्हटले. ईव्हीएममध्ये हस्तक्षेप करता येतो याचे प्रात्यक्षिक पक्षाचे ग्रेटर कैलासचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी विधानसभेच्या सभागृहात करून दाखवले.
गुजरात विधानसभा निवडणुकीतील सगळ्या ईव्हीएम आम्ही अवघ्या तीन तासांत हॅक करून दाखवू शकतो, असा दावाही भारद्वाज यांनी केला. भारद्वाज हे राजकारणात येण्यापूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. ‘‘ईव्हीएमचा मदरबोर्ड बदलण्यासाठी ९० सेकंद लागतात व तो बदलला की सगळी मते ठराविक राजकीय पक्षाला मिळतील, असे ते म्हणाले.
मिश्रांनी उडवली खिल्ली
पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आलेल्या कपिल मिश्रांनी आपच्या प्रात्यक्षिकाची खिल्ली उडविली. लोकांनी केजरीवाल यांना नाकारल्याचे ‘आप’ने स्वीकारण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. भाजपनेही या प्रात्यक्षिकावर टीका केली. (वृत्तसंस्था)
९० सेकंदांत करता येते हॅक -केजरीवाल-
९० सेकंदांत ईव्हीएममध्ये हेराफेरी करता येऊ शकते, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे, तसेच आम आदमी पार्टीला हा दावा सिद्ध करून देण्यासाठी ईव्हीएम देण्याचे आव्हानही त्यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. निवडणूक आयोगातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ईव्हीएम हॅकथॉन प्रात्यक्षिक कार्यक्रमात आम आदमी पार्टीही सहभागी होणार असून, ईव्हीएममध्ये हेराफेरी कशी करता येऊ शकते, हे सप्रयोग सिद्ध करून दाखविले जाईल, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे.
पाच नेत्यांविरुद्ध तक्रार-
हकालपट्टी झालेले मंत्री कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मंत्री सत्येंद्र जैन आणि आम आदमी पक्षाच्या पाच नेत्यांविरोधात मंगळवारी केंद्रीय गुप्तचर खात्याकडे (सीबीआय) तीन तक्रारी दाखल केल्या. आपच्या नेत्यांनी विदेश दौऱ्यांसाठी पक्षाच्या निधीचा गैरवापर केल्याचा मिश्रा यांचा आरोप आहे.
गुप्तांना सभागृहाबाहेर काढले-
केजरीवाल, जैन यांच्या कथित जमीन व्यवहाराचा मुद्दा दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते विजयेंद्र गुप्ता यांनी उपस्थित करताच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर गुप्ता यांना मार्शल्सकरवी सभागृहाबाहेर काढण्यात आले.
‘ते’ ईव्हीएमसदृश उपकरण -
दरम्यान, ईव्हीएममध्ये हेराफेरी करता येऊ शकते, हा आम आदमी पार्टीचा दावा फेटाळत असे करताच येत नाही, असा पुनरुच्चार निवडणूक आयोगाने केला. ज्या यंत्रात हेराफेरी करण्यात आली, ते ईव्हीएमसदृश उपकरण आहे. ईव्हीएम नाही. तेव्हा आम आदमी पार्टीचा दावा निराधार आहे. ईव्हीएमसारख्या दिसणाऱ्या उपकरणात हेराफेरी करता येऊ शकते. तथापि, त्या आधारावर ईव्हीएममध्येही हेराफेरी करता येऊ शकते, असा दावा करणे उचित नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.