बलात्काराचा विरोध करणा-या 60 वर्षीय महिलेची हत्या, आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 01:28 PM2017-11-27T13:28:52+5:302017-11-27T13:37:52+5:30
राजस्थानमध्ये एका 60 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या हत्येमागे शेजारीच राहणा-या तरुणाचा हात असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे, या तरुणाने महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला होता.
जयपूर - राजस्थानमध्ये एका 60 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या हत्येमागे शेजारीच राहणा-या तरुणाचा हात असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे, या तरुणाने महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. मात्र बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्याने महिलेची हत्या केली. पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, केळवाडा पोलीस ठाण्याचे एसएचओ विजेंद्र सिंह यांनी घटनेची माहिती देताना सांगितलं की, रविवारी सलेडी गावातील घऱात महिलेचा मृतदेह आढळला होता. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवण्यात आला होता. पोस्टमार्टम केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसएचओ विजेंद्र सिंह यांनी सांगितलं की, 'महिलेच्या हत्येच्या आरोपाखाली सूरजमल अहदी उर्प सुरजा याला सोमवारी पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केलं जाईल'. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असल्याचं विजेंद्र सिंह यांनी सांगितंल आहे. एका पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'गुरुवारी रात्री 11 वाजता महिला घरात एकटी असताना सूरजमल तिथे पोहोचला. यावेळी आरोपीने महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पण महिलेने विरोध करत सूरजमलला घराबाहेर हाकलण्यास सुरुवात केली. आरोपीने अचानक जवळ पडलेलं एक लाकूड उचललं आणि महिलेच्या डोक्यावर वार केला'.
डोक्यावर वार झाल्यानं महिला बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडली. आरोपीला महिला शुद्धीत आल्यानंतर सर्वांना घटनेबद्दल सांगेल, ज्यामुळे आपली बदनामी होईल अशी भीती वाटू लागल्याने त्याने दगडाने महिलेचं डोकं ठेचलं आणि हत्या केली. महिलेची हत्या केल्यानंतर ते फरार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला विधवा असून घरात एकटी राहत होती. त्यांची तिन्ही मुलं कामानिमित्त गावाबाहेर असतात. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.