मोबाईलमुळे होतात बलात्कार - कर्नाटक सरकारची समिती
By admin | Published: July 12, 2014 05:08 PM2014-07-12T17:08:22+5:302014-07-12T17:08:22+5:30
बलात्कार व विनयभंगांच्या घटनावाढीसाठी मोबाइल जबाबदार असल्याचा ठपका कर्नाटक विधीमंडळाच्या समितीने ठेवला असून शाळा व कॉलेजांमध्ये मोबाइलवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे.
Next
>ऑनलाइन टीम
बेंगळूर, दि. १२ - बलात्कार व विनयभंगांच्या घटनावाढीसाठी मोबाइल जबाबदार असल्याचा ठपका कर्नाटक विधीमंडळाच्या समितीने ठेवला असून शाळा व कॉलेजांमध्ये मोबाइलवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. महिलांच्या कपडे घालण्याच्या पद्धतीपासून ते त्यांच्या घराबाहेर पडण्याच्या वेळेपर्यंत सगळ्या प्रकारे त्यांना दोषी ठरवले गेल्यानंतर आता खुद्द सरकारी समितीने मोबाईलकडे अंगुलीनिर्देश केला आहे.
मुलींना निर्जन स्थळी बोलावण्यामध्ये व त्यांच्यावर बलात्कार करण्यामध्ये मोबाईलचा वापर झाल्याच्या अनेक घटना घडल्या असल्याचे या समितीने सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. शाळा व कॉलेजांमधल्या शैक्षणिक वातावरणाला सुरूंग लावण्याचे काम मोबाईल करत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. कर्नाटक विधीमंडळासमोर हा अहवाल शुक्रवारी ठेवण्यात आला आहे आणि शाळा व कॉलेजांमध्ये मोबाईलला बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे.
या समितीच्या अध्यक्ष व पुट्टूरच्या आमदार शकुंतला शेट्टी म्हणाल्या की ज्या मुली मिस्ड कॉलला प्रत्युत्तर देतात त्या त्रासामध्ये अडकतात असे स्पष्ट झाले आहे. जोपर्यंत मुलं सज्ञान होत नाहीत, त्यांना समज येत नाही तोपर्यंत त्यांना मोबाईल देऊ नये अशी शिफारस शेट्टी यांनी केली आहे. काय चांगलं काय वाईट याची समज त्यांना आल्यानंतर मुली सुरक्षित राहू शकतिल असंही त्या म्हणाल्या.
एका मुलीला तीन मुलांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ बोलावल्याचा व बलात्कार केल्याचा दाखला शेट्टी यांनी दिला आहे. या प्रसंगामध्ये त्या ठिकाणाहून स्वत:ला वाचवताना उंचावरून खाली पडल्याने त्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दाखलाही त्यांनी दिला.