बलात्कारातील दोषीला १० दिवसांत फाशी; ममता बॅनर्जी विधेयक आणणार, भाजपाचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 12:16 PM2024-09-02T12:16:35+5:302024-09-02T12:19:41+5:30

विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार असून मंगळवारी प्रस्तावित विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. ममतांच्या या भूमिकेला मुख्य विरोधी पक्ष भाजपा विधानसभेत पाठिंबा देणार आहे. 

Rape convict hanged in 10 days; Mamata Banerjee West Bengal to pass anti-rape bill in a special session, support of BJP | बलात्कारातील दोषीला १० दिवसांत फाशी; ममता बॅनर्जी विधेयक आणणार, भाजपाचा पाठिंबा

बलात्कारातील दोषीला १० दिवसांत फाशी; ममता बॅनर्जी विधेयक आणणार, भाजपाचा पाठिंबा

कोलकाता - पश्चिम बंगालमधील आरजी कर हॉस्पिटलमधील ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार हत्येनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या घटना रोखण्यासाठी कठोरात कठोर कायदा बनवावा अशी मागणी लोकांकडून व्हायला लागली. त्यातच सोमवारी पश्चिम बंगाल सरकारकडून विधिमंडळाचं २ दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. या अधिवेशनात महिला सुरक्षेसाठी एक विधेयक तृणमूल सरकारकडून मांडण्यात येणार असून या विधेयकाला भाजपानेही पाठिंबा दिला आहे.

लैंगिक अत्याचारातील दोषीला १० दिवसांत फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात आहे. आजपासून २ दिवसीय विशेष अधिवेशन सुरू होईल त्यानंतर मंगळवारी हे विधेयक मांडण्यात येईल. पश्चिम बंगालमधील प्रमुख विरोधी पक्ष भाजपानेही सरकारकडून आणलेल्या या विधेयकाचं स्वागत करत त्याला समर्थन दिले आहे. ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडून आणलेल्या विधेयकाला आम्ही पाठिंबा देऊ मात्र ममता यांच्या राजीनाम्याबद्दल विधिमंडळात निदर्शने केली जातील अशी माहिती भाजपा नेते सुकांत मजूमदार यांनी दिली.

कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या रेप आणि हत्या प्रकरणाने सत्ताधारी टीएमसी पक्ष अडचणीत आला. त्यात टीएमसीच्या अनेक नेत्यांची विधानेही वादात सापडली. त्यात खासदार कुणाल घोष यांनी रविवारी पीडित कुटुंबाची भेट घेतली. दोषीला कडक शिक्षा व्हावी आणि सीबीआय तपासाला गती मिळावी यासाठी आमचा पक्ष सहकार्य करेल असं कुणाल घोष यांनी म्हटलं. खासदार कुणाल घोष यांनी पीडित कुटुंबाला भेट देण्यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महासचिव अभिषेक बॅनर्जी यांचीही भेट घेतली. 

बंगालमध्ये आंदोलन सुरूच

आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रकरणाच्या ३ आठवड्यानंतरही बंगालमध्ये आंदोलन सुरूच आहे. रविवारी हजारो लोक कोलकातातील बलात्काराचा निषेध करत पीडितेच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. शहरातील उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अनेक रॅली काढण्यात आली होती. त्यात बंगाल फिल्म इंडस्ट्रीतील सिनेतारकांचाही सहभाग होता. अपर्णा सेन, स्वस्तिका मुखर्जी, सुदीप्त चक्रवर्ती, चैती घोषाल, सोहिनी सरकार यांनीही शहरात रस्त्यावर उतरून महिला डॉक्टरला न्याय देण्याची मागणी केली. 

Web Title: Rape convict hanged in 10 days; Mamata Banerjee West Bengal to pass anti-rape bill in a special session, support of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.