बलात्कारानंतर त्यानं तिला पेटवलं, पण तोच कर्माने मेला...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 02:13 PM2019-03-06T14:13:10+5:302019-03-06T16:40:57+5:30
पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार पीडित महिलेने जळत असताना मिठी मारल्यामुळे आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मालदा - पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार पीडित महिलेने जळत असताना मिठी मारल्यामुळे आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मालदा जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरी एकटीच असताना एक तरुण तिच्या घरात घुसला. तरुणाने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिला पेटवून दिलं.
तरुणाने महिलेला पेटवून दिल्यानंतर महिलेने आरोपी तरुणालाच मिठी मारली. घरातून धूर येत असल्याचे दिसताच शेजाऱ्यांनी महिलेच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी शेजाऱ्यांना दोन व्यक्ती जळत असलेल्या दिसल्या. त्यांनी त्वरीत या घटनेची पोलिसांना माहिती दिली. दोघांना उपचारासाठी जवळच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये आरोपी तरुणाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आगीत होरपळून पीडित महिलेच्या हाताला आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पोलिसांना पीडित महिलेच्या घरात रॉकेल सापडलं आहे. महिलेने तरुण आपल्याला सातत्याने त्रास देत होता अशी तक्रार केली आहे. तर शेजाऱ्यांनी हा तरुण वारंवार पीडित महिलेच्या घरी येत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. पीडित महिलेच्या घरापासून आरोपीचं घर हे 35 किलोमीटर दूर असताना तो का आला होता याचा तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.