अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार
By admin | Published: August 11, 2016 01:41 AM2016-08-11T01:41:22+5:302016-08-11T01:41:22+5:30
अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक बलात्कार, तर तिच्या मोठ्या बहिणीचा लैंगिक छळ केल्याची घटना हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्यात घडली.
सोनिपत : अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक बलात्कार, तर तिच्या मोठ्या बहिणीचा लैंगिक छळ केल्याची घटना हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्यात घडली. पीडित मुली नववी आणि दहावीत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेने गोहाना तालुक्यातील बरोडा मोर हे गाव चर्चेत आले आहे. हा तालुका जातीयवादी हिंसाचारासाठी कुख्यात आहे. दलितांवरील वाढत्या अत्याचारांवरून हरियाणात सातत्याने आंदोलने होत आहेत. जुलैमध्ये रोहतक जिल्ह्यात दलित मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर निदर्शनांना तोंड फुटले होते.
बरोडा मोर गावातील घटनेप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बरोडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजपाल यांनी सांगितले. तथापि, त्यांनी आरोपींची माहिती देण्यास नकार दिला. आम्ही गुन्हा दाखल केला असून, वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत, असे ते म्हणाले. या घटनेबाबत पोलीस अधीक्षक एच. एस. दून व रोहतक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. तथापि, संपर्क होऊ शकला नाही.
प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत होते, असा आरोप पीडित मुलींच्या वडिलांनी एका दैनिकाशी बोलताना केला. मी सकाळपासून ठाण्यात असून, रात्री उशिरा एफआयआर दाखल करण्यात आला, असे त्यांनी सांगितले. एका दैनिकाने एफआयआरची प्रत मिळवली. एफआयआरनुसार, या प्रकरणी अजय, बलराम आणि प्रदीप यांच्याविरुद्ध बलात्कार, लैंगिक छळ आणि धाकदपटशाच्या आरोपांसह पोक्सा कायद्यातील विविध कलमे, तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अजय हा आमचा दूरचा नातेवाईक आहे, तर बलराम आणि प्रदीप हे गावातील आहेत, असे पीडित मुलींच्या वडिलांनी सांगितले. (वृत्तसंस्था)