बलात्काराचा सेक्सशी संबंध नाही - शर्मिला टागोर
By admin | Published: October 13, 2016 11:24 AM2016-10-13T11:24:35+5:302016-10-13T11:47:39+5:30
प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी हिंदुस्थान टाइम्स या वर्तमानपत्राच्या माध्यमातून देशवासियांना एक खुले पत्र लिहीले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - एककाळ आपल्या अभिनयाने रुपेरी पडदा गाजवणा-या प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी हिंदुस्थान टाइम्स या वर्तमानपत्राच्या माध्यमातून देशवासियांना एक खुले पत्र लिहीले आहे. या पत्रातून त्यांनी महिलांविरोधातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर भाष्य केले आहे. महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी आपल्याला दृष्टीकोनात बदल करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी या पत्रात व्यक्त केले आहे.
मागच्या काही दिवसात दिल्लीतील प्रमुख वर्तमानपत्राच्या मुख्य बातम्या बघितल्या तर, तरुण मुलींची निदर्यतेने हत्या केल्याच्या घटना दिसतील. या बातम्या वाचून संवेदनाशून्य, कठोर ह्दयाच्या व्यक्तीलाही धक्का बसेल. या सर्व घटनांच्या मूळाशी एकच कारण आहे ते म्हणजे मुलीने दिलेला नकार. आर्थिक संपन्नता, स्वातंत्र्य आणि यश मिळवल्यानंतरही मला कधी कधी मी सशक्त आहे का ? असा प्रश्न पडतो.
मला अजूनही तो दिवस आठवतो. मी हैदराबाद रेल्वे स्टेशनवर उतरली होती. माझ्या गाडीला स्टेशनवर पोहोचायला काही मिनिटे उशिर झाला होता. तितक्यात घोळका माझ्याभोवती जमला होता. त्यावेळी तीन महिन्यांचा सैफ माझ्या हातात होता. त्यामुळे मला एक वेगळी आदराची वागणूक मिळाली. काही महिन्यांपूर्वी एका ठिकाणी मला घोळक्याकडून मिळालेली प्रतिक्रिया पूर्णपणे वेगळी होती. त्यात फरक होता.
सार्वजनिक ठिकाणी महिलेला आदर मिळाला पाहिजे आणि सुरक्षित वाटले पाहिजे त्यातून महिलांमध्ये सबलीकरण झाल्याची भावना निर्माण होईल. दुर्देवाने सार्वजनिक आणि खासगी, दोन्हीकडे अशी भावना दिसत नाही. आपल्याला आपल्या दृष्टीकोनात बदल करण्याची गरज आहे असे मत शर्मिला टागोर यांनी व्यक्त केले आहे.
महिलांवर होणारे हिंसाचार आणि बलात्कार या दोन्ही गोष्टींचा सेक्सशी संबंध नाही. हिंसाचार आणि बलात्कारमागे शक्तीचा दुरुपयोग करणे, महिलेचा अपमान करणे, तिच्या माध्यमातून कुटुंबाला धडा शिकवणे असे हेतू असतात असे शर्मिला टागोर यांनी पत्रात म्हटले आहे.