बलात्कारित मुलीला दिली गर्भपाताची मुभा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2015 02:47 AM2015-07-31T02:47:38+5:302015-07-31T02:47:38+5:30
२० आठवड्यांहून जास्त वाढलेला गर्भ गर्भपात करून काढून टाकणे हा प्रचलित कायद्यानुसार गुन्हा असूनही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका मानवतावादी व पथदर्शक निकालामुळे
नवी दिल्ली : २० आठवड्यांहून जास्त वाढलेला गर्भ गर्भपात करून काढून टाकणे हा प्रचलित कायद्यानुसार गुन्हा असूनही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका मानवतावादी व पथदर्शक निकालामुळे गुजरातमधील एका १४ वर्षांच्या मुलीस बलात्कारातून राहिलेला तिच्या २४ आठवड्यांच्या गर्भाचा गर्भपात करण्याची परवानगी मिळाली आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कारातून लादले जाणारे मातृत्व ही भारतीय समाजापुढील नवी समस्या असून कायद्याच्या कचाट्यामुळे अशा मुलींच्या नशिबी येणाऱ्या उद््ध्वस्त आयुष्यातून सुटका करण्याचा मार्ग या प्रकरणाने प्रशस्त होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या निकालानुसार अहमदाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने या मुलीची गुरुवारी शारीरिक व मानसिक तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांनी गर्भपात न करणे या मुलीच्या आयुष्यास धोकादायक आहे, असा अहवाल दिल्याने या मुलीचा कदाचित उद्या शुक्रवारी गर्भपात केला जाईल, असे सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक एम. एम. प्रभाकर यांनी सांगितले.
आपण कायद्याचा भंग करून या मुलीस गर्भपाताची सरसकट परवानगी देऊ शकत नाही. परंतु म्हणून नको असलेला गर्भ पूर्ण नऊ महिने वाढवून बाळाला जन्म देण्याची सक्ती केली गेली तर ती कदाचित जिवाचे काही बरेवाईट करून घेण्याचा धोका आहे, हे लक्षात घेऊन न्या. अनिल आर. दवे आणि न्या. कुरियन जोसेफ यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
कायद्याच्या कचाट्यातून हा मार्ग काढण्याआधी न्यायालयाने अशी सूचना केली की, या मुलीने गर्भ पूर्ण नऊ महिने वाढू द्यावा व जन्माला येणारे बाळ तिने लगेच दत्तक द्यावे. परंतु या मुलीच्या वकील कामिनी जयस्वाल यांनी असे करणे अन्यायाचे होईल, असे सांगताना नमूद केले की, बलात्कार आणि त्यातून राहिलेल्या गर्भाने ही मुलगी आधीच शरीराने खंगली आहे व मनाने उद््ध्वस्त झाली आहे. गरोदर असल्याचे कळल्यापासून तिने हे मूल आपल्याला नको आहे, असे मनाशी ठामपणे ठरविले आहे. शिवाय अशा अबोध वयात नशिबी आलेल्या कुमारी मातृत्वाने ती भावी आयुष्यही सुखाने जगू शकणार नाही. या सर्वातून सुटका करून घेण्यासाठी ती आत्महत्येसारखे आततायी पाऊल उचलण्याचाही धोका आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
डॉक्टरने केला बलात्कार
गेल्या फेब्रुवारीत ही मुलगी थायरॉइडच्या आजारावर उपचार करून घेण्यासाठी डॉ. जतीनभाई के. मेहता यांच्याकडे गेली.
डॉक्टरने भूल येणारे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. वाच्यता न करण्याचा दमही दिला.
सुमारे चार महिन्यांनी पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या तेव्हा तपासणी केली आणि ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. नेमके काय झाले हे समजून त्या मानसिक धक्क्यातून सावरेपर्यंत तिला सहावा महिना लागला व गर्भपात करायचा म्हटले तरी त्याचे कायदेशीर मार्ग बंद झाले.
मुलीच्या वडिलांनी आधी सत्र न्यायालयात व नंतर उच्च न्यायालयात गर्भपात करू द्यावा, यासाठी याचिका केल्या. दोन्ही न्यायालयांनी सहानुभूती व्यक्त केली, पण कायद्यावर बोट ठेवले. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आले.
आणखी एक प्रकरण
गेल्या वर्षी गुजरातमध्ये असेच एक प्रकरण झाले होते. त्यातील बलात्कारित मुलगी २४ वर्षांची होती. तिलाही कायद्याच्या बंधनामुळे न्यायालयाने गर्भपात करू दिला नाही. तिने नाइलाजाने मुलाला जन्म दिला व आता या नकोशा असलेल्या मुलाचे मी काय करू, असा प्रश्न घेऊन ती उच्च न्यायालयात गेली. त्या मुलाचे पालनपोषण गुजरात सरकारने करावे, असा आदेश देऊन न्यायालयाने मार्ग काढला.