उन्नावमधील बलात्कार पीडितेची प्रकृती चिंताजनक, अपघातात फुफ्फुसांना झाली दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 04:47 PM2019-07-29T16:47:38+5:302019-07-29T18:44:22+5:30
कारला ट्रकने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या उन्नाव येथील बलात्कार पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे.
लखनौ - कारला ट्रकने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या उन्नाव येथील बलात्कार पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे. लखनौ येथील केजीएमसी रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू असून, तिच्या फुफ्फुसांना दुखापत झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या उन्नाव येथील महिलेच्या कारला रविवारी उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील अतरुआ गावानजीक भीषण अपघात झाला होता. या अपघातात पीडित महिला तिचा वकील गंभीर जखमी झाले होते. तर महिलेची मावशी आणि काकीचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या या महिलेला काही काळासाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच पीडितेचा रक्तदाब सातत्याने कमी होत आहे. तसेच अपघाताच्या तीव्रतेमुळे पीडित महिलेच्या डाव्या खांद्याचे हाड, उजवा हात आणि उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. पीडित तरुणीचे काका तुरुंगात असून त्यांना भेटण्यासाठी काकी, वकील आणि बलात्कार पीडित तरुणी रायबरेली येथे जात होते. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकने कारला मागून येऊन जोरदार धडक दिली. या धडकेत मावशी आणि काकीचा जागीच मृत्यू झाला तर बलात्कार पीडित तरुणी आणि वकील गंभीर जखमी झाले आहेत.
उन्नाव येथील बलात्कार प्रकरणात सीबीआयनं भाजपा आमदार कुलदीप सेंगरसह इतरांच्या नावांचा समावेश असलेलं आरोपपत्र दाखल केलं आहे. कुलदीपनं पीडित तरुणीवर बलात्कार केल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. सेंगरचा भाऊ जयदीप सिंह याच्यासह पाच आरोपींच्या नावाचा समावेश होता. उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयनं भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेंगरला ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्याविरोधात तीन गुन्हे दाखल देखील करण्यात आले होते. भारतीय दंडसंहितेच्या कलम 363 (अपहरण), 366 (महिलेचे अपहरण), 376 (बलात्कार), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं.
नेमके काय आहे प्रकरण?
भाजपा आमदार कुलदीपसिंग सेंगर व त्यांच्या साथीदारांनी जून 2017 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (8 एप्रिल 2018) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु, उन्नाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान ते मरण पावले होते.