बलात्कार पीडितेने रक्ताने पत्र लिहून नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथांकडे मागितली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 05:41 PM2018-01-23T17:41:38+5:302018-01-23T17:44:18+5:30
आरोपींविरोधात कारवाई होत नसल्या कारणाने त्रस्त असलेल्या एका बलात्कार पीडित तरुणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रक्ताने पत्र लिहून मदत मागितली आहे
लखनऊ - उत्तर प्रदेशमध्ये महिलांविरोधातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्य सरकार आणि प्रशासन मात्र फक्त तमाशा पाहत असल्याचं चित्र सध्या राज्यात दिसत आहे. राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे गुन्हेगारांची हिंमतही वाढू लागली आहे. परिस्थिती अशी आहे की, गुन्हेगार मोकळेपणाने फिरत असून पोलीस त्यांच्यावर कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीयेत. रायबरेली जिल्ह्यात तर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींविरोधात कारवाई होत नसल्या कारणाने त्रस्त असलेल्या एका बलात्कार पीडित तरुणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रक्ताने पत्र लिहून मदत मागितली आहे.
रायबरेलीची राहणारी असणा-या या विद्यार्थिनीने 20 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आपल्या रक्ताने लिहिलेल्या पत्रात आरोप केली आहे की, आरोपींची वरपर्यंत ओळख असल्या कारणाने पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीयेत. याशिवाय आरोपी तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत असल्याचाही आरोप तरुणीने केला आहे.
जर मला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकी या तरुणीने दिली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशी शेखर सिंह यांनी सांगितल्यानुसार, 'बाराबंकी येथे इंजिनिअरिंगचा अभ्यास करणा-या रायबरेलीमधील एका तरुणीच्या वडिलांनी मार्च महिन्यात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एक तरुण आपल्या मुलीला त्रास देत असल्याचं त्यांनी तक्रारीत सांगितलं होतं'.
तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, 'आरोपी एक दिवस जबरदस्ती त्यांच्या मुलीला बंगल्यात घेऊन गेला. तिथे एका मित्राच्या मदतीने त्याने मुलीवर बलात्कार केला. तेव्हापासून आरोपी ब्लॅकमेल करत आहे'. पीडित तरुणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी 24 मार्च 2017 रोजी आरोपी दिव्य पाण्डे आणि अंकित वर्मा विरोधात बलात्कारासहित इतर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती शशी शेखर सिंह यांनी दिली आहे.
शशी शेखर सिंह यांनी सांगितल्यानुसार, यानंतर 9 ऑक्टोबर 2017 रोजी तरुणीच्या वडिलांनी त्यांच्या दुस-या मुलीच्या नावे फेसबूकवर बनावट अकाऊंटवर तयार करुन अश्लील पोस्ट करत असल्याची तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आपल्याला रक्ताने पत्र लिहिलं असल्याची कोणतीही माहिती मिळाली नसल्याचं सांगितलं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.