आझम खान विरोधात बलात्कार पीडिता कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2016 06:05 AM2016-08-15T06:05:13+5:302016-08-15T06:05:13+5:30
बलात्काराची शिकार झालेल्या माय-लेकींनी उत्तर प्रदेशचे नगरविकासमंत्री तथा सपा नेते आझम खान यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बुलंद शहर येथे महामार्गानजीक बलात्काराची शिकार झालेल्या माय-लेकींनी उत्तर प्रदेशचे नगरविकासमंत्री तथा सपा नेते आझम खान यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हा खटला उत्तर प्रदेशबाहेर हलविण्यात यावा, तसेच आझम खान आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
२९ जुलै रोजी नोएडा येथील एक कुटुंब प्रवास करीत असताना बुलंद शहरजवळ दरोडेखोरांनी त्यांना अडवून एक महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. बलात्काराच्या घटनेमागे राज्य सरकारला बदनाम करण्याचा राजकीय कट आहे, असा आरोप आझम खान यांनी केला होता.
त्याविरुद्ध पीडित माय-लेकींच्या वतीने एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अॅड. किसले पांडे यांच्या वतीने दाखल झालेल्या या याचिकेत म्हटले आहे की, आझम खान यांनी असे वक्तव्य करून पीडितांचा अवमान आणि विनयभंग केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच हे प्रकरण तपासासाठी दिल्लीत हटविण्यात यावे. उत्तर प्रदेश पोलिसांचा तपास अजिबात समाधानकारक नाही. बलात्कार झाल्यानंतर पीडितांनी पोलीस हेल्पलाईनच्या १00 क्रमांकावर वारंवार फोन लावला. तथापि, त्यावर कोणतीही मदत मिळाली नाही. यात दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरही गुन्हे नोंदविण्यात यावेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>पोलीस अधीक्षक प्रतिवादी
या प्रकरणात राज्याचे गृहसचिव, आझम खान, पोलीस महासंचालक, बुलंद शहरचे पोलीस अधीक्षक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
पीडितांची मानहानी केल्याबद्दल, तसेच मूलभूत हक्कांचा भंग केल्याबद्दल पीडितांना योग्य नुकसानभरपाई देण्याचे आदेश प्रतिवाद्यांना देण्यात यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
तसेच यापुढे पीडितांच्या मूलभूत हक्कांचा भंग होईल, असे कोणतेही वक्तव्य करू नये, असे आदेश देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली आहे.