बलात्कारपीडित बालिकेची दिल्लीत मृत्यूशी झुंज
By admin | Published: October 11, 2015 11:38 PM2015-10-11T23:38:26+5:302015-10-11T23:38:26+5:30
दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात चार वर्षांची बलात्कारपीडित बालिका मृत्यूशी झुंज देत आहे. नराधमाने तिला गंभीर जखमी आणि निर्वस्त्र अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले.
नवी दिल्ली : दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात चार वर्षांची बलात्कारपीडित बालिका मृत्यूशी झुंज देत आहे. नराधमाने तिला गंभीर जखमी आणि निर्वस्त्र अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले. गंभीर जखमी असलेली ही बालिका अतिदक्षता विभागात अखेरच्या घटका मोजत आहे. २०१२ मधील निर्भया सामूहिक बलात्कार आणि मृत्यू प्रकरणाच्या कटू स्मृती अद्याप पुरेशा पुसल्या गेल्या नसताना या घटनेने समाजमनाला हादरवून सोडले.
वायव्य दिल्लीतील केशवपुरम येथील तिच्या घराजवळच ती शुक्रवारी रात्री बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिचे आई-वडील अतिशय गरीब असून, तिला आधी स्थानिक रुग्णालयात व नंतर सफदरजंगमध्ये हलविण्यात आले. तिच्या संपूर्ण अंगावर गंभीर जखमा आहेत. तिला आणले तेव्हा रक्तस्राव सुरू होता. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिची अवस्था गंभीर असल्याचे टिष्ट्वट दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी केले आहे. तिच्या घराजवळ दारूचे दुकान असून, कुणीतरी मद्य पिऊन कुकृत्य केले असावे. ती घरून बेपत्ता कशी झाली हे अन्य मुलांना आठवत नाही.
दिल्ली असुरक्षितच
पुन्हा एकदा दिल्लीचा भेसूर चेहरा समोर आला आहे. राजधानीत २०१४ मध्ये केवळ नऊ आरोपी महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात दोषी आढळले. तुम्ही कल्पना करू शकता का? असा सवाल मालीवाल यांनी टिष्ट्वटरवर केला. तीन वर्षांपूर्वी दिल्ली महिलांसाठी असुरक्षित होती, आजही ती तशीच आहे, असे त्या म्हणाल्या.