बलात्कारित युवतीच्या वडिलांचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 04:17 AM2018-04-10T04:17:37+5:302018-04-10T04:17:37+5:30

उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार कुलदीपसिंग सेनगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या युवतीच्या वडिलांना पोलिसांनी रविवारी अटक केली होती.

Rape victim's father gets suspicious death in police custody | बलात्कारित युवतीच्या वडिलांचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू

बलात्कारित युवतीच्या वडिलांचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू

Next

लखनौ : उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार कुलदीपसिंग सेनगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या युवतीच्या वडिलांना पोलिसांनी रविवारी अटक केली होती.
त्यांचा पोलीस कोठडीत असताना, सोमवारी सकाळी संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला आहे. त्यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी भाजपा आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या युवतीच्या वडिलांना पोलीस कोठडीत पोटात दुखायला लागले व उलटीही झाली. त्यामुळे रविवारी रात्री त्यांना पोलिसांनी उन्नाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. वडिलांच्या मृत्यूमुळे आता या सर्व प्रकरणाला वेगळे वळण लागणार आहे. त्यांना कोठडीत पोलिसांनी बेदम मारहाण असल्याचा संशय आहे. ज्या आमदारावर बलात्काराचा आरोप आहे, त्याच्या भावाच्या सांगण्यावरून पोलिसांनी वडिलांना मारहाण केली, असा नातेवाइकांचा आरोप आहे. त्या प्रकरणी चौकशी सुरू केल्याचे उनावच्या पोलीस अधीक्षक पुष्पांजली देवी यांनी सांगितले.
सेनेगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणाºया युवती व तिच्या घरातील काही महिलांनी रविवारी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा केलेला प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला होता. त्या वेळी तिच्या कुटुंबातील काही मंडळींनीही निदर्शने केली होती. या सर्वांना पोलिसांनी अटक केली होती. सेनगर यांना मात्र हे आरोप मान्य नाहीत. आपल्या राजकीय विरोधकांनी रचलेले हे कारस्थान आहे, असा त्यांचा दावा आहे. (वृत्तसंस्था)
>संरक्षण देण्याची युवतीची मागणी
सेनगर यांनी आपल्यावर बलात्कार केला असून त्यांना अटक करा, अशी मागणी या युवतीने एका पत्रकार परिषदेत केली होती. अन्यथा स्वत:ला संपविण्याचा इशारा तिने दिला होता. बलात्कार प्रकरणी कोणाला काही सांगितलेस, तर तुझ्या कुटुंबीयांना ठार मारू, अशी धमकीही आपल्याला देण्यात आल्याचा दावा तिने केला होता. पोलीस कोठडीत असताना वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आता आपल्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी आता या युवतीने केली आहे.

Web Title: Rape victim's father gets suspicious death in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.