धक्कादायक! गंगेत स्नान करणा-या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 12:58 IST2018-10-04T12:58:08+5:302018-10-04T12:58:24+5:30
बिहार एका महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारानं खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! गंगेत स्नान करणा-या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींना अटक
पाटणा- बिहार एका महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारानं खळबळ उडाली आहे. जेव्हा ती महिला गंगेच्या पवित्र पाण्यात आंघोळ करत होती त्यावेळीच तिच्यावर हा बलात्कार करण्यात आला. बाड पोलीस स्टेशमध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. मुलाच्या दीर्घायुष्यासाठी या महिलेनं जीवित पुत्रिक व्रत केलं होतं. या व्रतादरम्यान महिला गंगेत आंघोळ करत असतानाच दोघा नराधमांनी तिकडे येऊन त्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि त्या घटनेचा एक व्हिडीओ बनवून व्हायरल केला.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ वा-यासारखा पसरल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, एका 40 वर्षांच्या महिलेनं व्रत केलं असून, ती गंगेत स्नान करत होती. त्यावेळी गंगेच्या घाटावर कोणीही नव्हते. त्यावेळी तिथे दोन जण आले आणि त्यांनी महिलेला पकडून तिच्यावर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केला. तसेच दुसरा बलात्कार करत असताना एकानं त्याचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना या घटनेसंदर्भात समजलं. त्यानंतर दुस-या तरुणानंही त्या महिलेवर बलात्कार केला.
बाड पोलीस प्रमुख अबरार अहमद खान म्हणाले, पीडित महिलेचा जबाब नोंदवून घेतला आहे. सर्व प्रकाराची चौकशी सुरू आहे. पाटण्याचा वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनू महाराज यांनी या प्रकरणात आरोपी शिवपूजन महतो आणि विशाल कुमारला अटक केली आहे. दोन्ही आरोपी हे पीडितेच्या गावातच वास्तव्याला आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करत नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. तेजस्वीनं या प्रकरणात ट्विट करत टीका केली आहे. ट्विट करत तेजस्वी म्हणाले, या नराधमांनी महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिचा व्हिडीओ काढला आहे. तसेच व्हायरलसुद्धा केला. बिहारमधील मुलांच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करणा-या एका आईवर बलात्कार झाला आहे, ही लांच्छनास्पद गोष्ट आहे.