संतापजनक ! अश्लिल व्हिडीओ बनवून तरुणीवर सलग 3 महिने केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 10:20 AM2018-09-18T10:20:49+5:302018-09-18T10:30:38+5:30
एका तरुणीची अश्लिल व्हिडीओ क्लिप बनवून तिच्यावर सलग तीन महिने बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बीकानेर - एका तरुणीची अश्लिल व्हिडीओ क्लिप बनवून तिच्यावर सलग तीन महिने बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीकानेरमधील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील ही संतापजनक घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पीडित तरुणीनं यासंबंधी तक्रार नोंदवली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसिफ आणि राजा अशी आरोपींची नावं आहेत.
''आरोपी आसिफने मिठाईमध्ये गुंगीचे औषध मिसळून खायला दिले, यानंतर काही वेळानं माझी शुद्ध हरपली. बेशुद्धावस्थेत असताना माझ्यावर अत्याचार करण्यात आले व या घटनेची व्हिडीओ क्लिप बनवण्यात आली. ही व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आसिफ आणि राजा वारंवार धमकावत होते'',असा आरोप पीडितेनं केला आहे. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दोघांनीही सलग तीन महिने अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पीडितेनं केला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी या प्रकारानं टोक गाठले.
9 सप्टेंबरला दोन्ही आरोपींनी पीडितेला बोलवून जबरदस्तीनं विष पाजले, ज्यामुळे तिची प्रकृती बिघडली. यानंतर तातडीनं पीडितेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही आरोपींनी पीडितेला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. दरम्यान, याप्रकरणी पीडितेचा जबाब घेण्यात आला असून चौकशी सुरू आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणाला अटक करण्यात आलेली नाही.