पाच वर्षापुर्वी केला होता बलात्कार, लग्नानंतर तिच्या पतीला पाठवला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 04:16 PM2017-11-27T16:16:37+5:302017-11-27T16:19:17+5:30
पाच वर्षांपुर्वी अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. कोलार जिल्ह्यातील श्रीनिवासपूरमध्ये ही घटना घडली आहे. आरिफ असं आरोपीचं नाव आहे. पाच वर्षांपुर्वी त्याने तरुणीवर बलात्कार करुन आपल्या दोन मित्रांच्या सहाय्याने चित्रीकरण केलं होतं.
कोलार - पाच वर्षांपुर्वी अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. कोलार जिल्ह्यातील श्रीनिवासपूरमध्ये ही घटना घडली आहे. आरिफ असं आरोपीचं नाव आहे. पाच वर्षांपुर्वी त्याने तरुणीवर बलात्कार करुन आपल्या दोन मित्रांच्या सहाय्याने चित्रीकरण केलं होतं. तरुणीच्या लग्नानंतर त्याने हा व्हिडीओ तिच्या पतीला पाठवला. ज्यामुळे सहा महिन्यांपुर्वी त्यांचा घटस्फोट झाला. आरिफने मित्रांसोबत पुन्हा एकदा ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्याने पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
मुख्य आरोपी आरिफला अटक करण्यात आली असून, त्याचे मित्र तौशिफ आणि सय्यद फरार आहेत. दोघेही एका कार पेंटिंग गॅरेजमध्ये काम करत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
2012 मध्ये आरिफ आपल्या शेजारी राहणा-या या तरुणीला घेऊन एका निर्मनुष्य ठिकाणी गेला होता. तिथे गेल्यावर त्याने तिच्या पेयात गुंगीचं औषध मिसललं आणि नंतर बलात्कार केला. तरुणीने आपल्या आई-वडिलांना बलात्कार झाल्याचं सांगितलं होतं. बदनामीच्या भीतीने त्यांच्यातील ज्येष्ठ लोकांनी बातचीत करुन मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. आरिफलाही तरुणीपासून लांब राहण्याची ताकीद देण्यात आली. 2015 मध्ये तरुणीचं हैदराबादमधील एका तरुणासोबत लग्न लावून देण्यात आलं.
आरिफ मात्र अद्यापही तिच्या मागावर होता. त्याने तरुणीच्या पतीचा फोन क्रमांक मिळवला आणि आपल्याकडे तुझ्या पत्नीचे नग्न फोटो असून, तिच्यावर बलात्कार केला असल्याचं सांगू लागला. सुरुवातीला तरुणीच्या पतीने त्याला धुडकावून लावलं. म्हणून मग त्याने आपण चित्रीत केलेले व्हिडीओ आणि फोटो त्याला पाठवले.
घटस्फोट झाल्यामुळे खचलेली तरुणी आपल्या माहेरी परतली. यावेळी आरोपी पुन्हा एकदा तिच्या संपर्कात आला आणि त्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्रासलेल्या तरुणीने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरिफला अटक केली असून, त्याच्या मित्रांचा शोध घेत आहे.