ब्रह्मज्ञानी माणसानं बलात्कार केल्यास ते पाप नाही- आसाराम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 09:35 PM2018-04-26T21:35:03+5:302018-04-26T21:35:03+5:30
फिर्यादी पक्षाच्या साक्षीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती समोर
जोधपूर: ब्रम्हज्ञानी माणसानं मुलीचं लैंगिक शोषण केल्यास ते पाप ठरत नाही, असं स्वयंघोषित संत आसाराम बापूचं मत आहे. आसाराम बापूविरोधात खटला चालू असताना फिर्यादी पक्षाच्या साक्षीदारानं ही बाब न्यायालयाला सांगितली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसारामला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
आसाराम लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी औषधं घ्यायचा, अशी माहिती फिर्यादी पक्षाचा साक्षीदार राहुल साचारनं न्यायालयाला दिली. राहुल साचार आसारामचा भक्त होता. त्यानं दिलेल्या साक्षीचा उल्लेख न्यायालयाच्या ४५३ पानांच्या निकालपत्रात आहे. राहुल हा आसारामचा अतिशय जवळचा अनुयायी असल्यानं त्याला कुटियामध्ये प्रवेश दिला जायचा. त्यानं 2003 मध्ये पुष्कर (राजस्थान), भिवानी (हरयाणा) आणि अहमदाबाद (गुजरात) येथील आश्रमांमधील आसारामच्या लिला पाहिल्या होत्या. या ठिकाणी आसारामनं मुलींचं लैंगिक शोषण केलं होतं.
आसारामनं 'या' कामासाठी तीन मुलींची नेमणूक केली होती. आसाराम या तीन मुलींना टॉर्चच्या मदतीनं 'सिग्नल' द्यायचा. हा सिग्नल मिळाल्यावर ठरलेल्या मुलींना आसारामच्या कुटियामध्ये आणलं जायचं. या मुलींची निवड करण्यासाठी आसाराम तीन मुलींसोबत संपूर्ण आश्रमात फिरायचा, अशी माहितीही राहुल साचारनं न्यायालयाला दिली. अहमदाबादच्या आश्रमात असताना राहुलनं एकदा आसारामच्या कुटियाची भिंत ओलांडून आत प्रवेश केला. त्यावेळी आसाराम मुलींचं शोषण करत होता. याचा जाब विचारणारं पत्र लिहून राहुलनं आचाऱ्याकडे दिलं. त्यानंतर हे पत्र आसारामनं वाचलं. मात्र त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं. ही संपूर्ण हकिकत राहुलनं न्यायालयाला सांगितली.