बलात्कारी सुटला

By Admin | Published: December 21, 2015 02:33 AM2015-12-21T02:33:49+5:302015-12-21T02:33:49+5:30

तीन वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला सुन्न करणाऱ्या निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराची रविवारी सायंकाळी बालसुधारगृहातून सुटका करण्यात आल्यानंतर राजधानीत संतापाची लाट उसळली.

The rapist | बलात्कारी सुटला

बलात्कारी सुटला

googlenewsNext

निर्भयाप्रकरणी कायद्याची पूर्तता : निषेध करणाऱ्या पालकांना पोलिसांनी उचलले
नवी दिल्ली : तीन वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला सुन्न करणाऱ्या निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराची रविवारी सायंकाळी बालसुधारगृहातून सुटका करण्यात आल्यानंतर राजधानीत संतापाची लाट उसळली. या गुन्हेगाराला एका स्वयंसेवी संस्थेच्या हवाली केले गेले. मात्र त्याला कुठे नेले गेले हे मात्र गोपनीय ठेवले गेले आहे. या गुन्हेगाराला सोडले जाऊ नये यासाठी निदर्शने करणाऱ्या निर्भयाच्या आई-वडिलांसह इतरांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले.
कायद्यानुसार त्याला जेवढा काळ बालसुधारगृहात ठेवणे शक्य होते तेवढे ठेवले गेले. त्याने उत्तर प्रदेशातील बदायूँ या आपल्या मूळ गावी परतण्याऐवजी सुरक्षेच्या कारणास्तव स्वयंसेवी संस्थेकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्याला त्या संस्थेच्या ताब्यात देऊन त्याची अज्ञात स्थळी रवानगी केली गेली.
तो आता पोलिसांच्या कार्यकक्षेत नाही. त्याला नवी ओळख देण्यात आली असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पूर्णपणे पुसून टाकली आहे, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. गुन्ह्याच्या वेळी बालगुन्हेगार होता एवढ्याच कारणावरून या गुन्हेगाराची फाशी टळली. त्याच्या सोबतच्या इतर तीन सिद्धदोष गुन्हेगारांची फाशी सुप्रीम कोर्टापर्यंत कायम होऊन ते काळकोठडीत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
महिला आयोगाचा अयशस्वी प्रयत्न
गुन्ह्याच्या वेळी १७ वर्षांचा असलेला हा गुन्हेगार आता
२० वर्षांचा झाला असून, कायद्यानुसार त्याला तीन वर्षांपेक्षा जास्त काळ बालसुधारगृहात ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट करीत दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला मुक्त करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे रविवारी सायंकाळी त्याला सोडले जाणार हे ठरलेले होते.
शेवटचा प्रयत्न म्हणून दिल्ली महिला आयोगाने त्याच्या सुटकेविरुद्ध शनिवारी मध्यरात्रीनंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सरन्यायाधीशांनीही पहाटे १.३० वाजता त्यासाठी विशेष खंडपीठ बसविले. पण न्यायाधीशांनी त्याची सुटका टळेल असा कोणताही आदेश न देता आयोगाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी ठेवली.
त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निदान सोमवारपर्यंत तरी त्याला सोडू नका, अशी विनंती महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल यांनी बालगुन्हेगार न्याय मंडळास केली. पण न्यायालयाचा तसा कोणताही आदेश नसल्याने काही करता आले नाही.
तीन मुद्द्यांवर याचिका
महिला आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत या गुन्हेगाराला न सोडण्याची प्रामुख्याने तीन कारणे नमूद केली...
१ लोकांच्या मनातील संताप पाहता बाहेर आल्यावर या गुन्हेगाराच्या जिवाला धोका आहे.
२ बालसुधारगृहात असताना यूपीतील एका बालगुन्हेगाराने त्याच्या डोक्यात धार्मिक कट्टरवादाचे भूत भरविले असल्याचा ‘आयबी’चा अहवाल आहे.
३ तीन वर्षे सुधारगृहात राहून तो सुधारल्याचे ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे सुटल्यावर पुन्हा तो तेच गुन्हे करण्याची भीती.
आम्ही असहाय बनलो आहोत. आमचे सरकार, मग ते राज्याचे असो की केंद्राचे, तुम्ही निदर्शने करता तेव्हा केवळ ऐकून घेते. तुमच्यावर लाठीमार करते. ते तुमच्याबद्दल बेपर्वा असतात.
- बद्रीसिंग पांडे,
निर्भयाचे वडील
बलात्कारी सुटणार हे सर्वांना माहीत होते. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत त्याची सुटका होऊ नये यासाठी पुरेशी पावले उचलायला हवी होती.
- आशादेवी, निर्भयाची आई

Web Title: The rapist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.