"बलात्काऱ्यांना नपुंसक करा, शिवाजी महाराजांनीही हात-पाय तोडले होते"; काय म्हणाले राज्यपाल हरीभाऊ बागडे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:13 IST2025-03-11T10:09:31+5:302025-03-11T10:13:08+5:30
महिलांना छेडणाऱ्यांना बदडून काढा आणि बलात्काऱ्यांना नपुंसक करा. तेव्हा कुठे असे गुन्हे कमी होतील, असे हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे.

"बलात्काऱ्यांना नपुंसक करा, शिवाजी महाराजांनीही हात-पाय तोडले होते"; काय म्हणाले राज्यपाल हरीभाऊ बागडे?
महिलांवरील बलात्कार आणि छेडछाडीच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. यासंदर्भात आता राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मोठे विधान केले आहे. महिलांना छेडणाऱ्यांना बदडून काढा आणि बलात्काऱ्यांना नपुंसक करा. तेव्हा कुठे असे गुन्हे कमी होतील, असे हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे. ते सोमवारी भरतपूर जिल्हा बार असोसिएशनच्या शपथ ग्रहण समारंभात बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हात-पाय तोडण्याचे आदेश दिले होते -
हरिभाऊ बागडे पुढे म्हणाले, "आमच्याकडे (महाराष्ट्रात) जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते, तेव्हा गावच्या एका पाटलाने बलात्कार केला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात-पाय तोडण्याचे आदेश दिले होते."
...तोवर हे गुन्हे थांबणार नाहीत -
बागडे पुढे म्हणाले, "लोक महिलांवरील अत्याचाराचे व्हिडिओ तयार करतात. हे बरे नाही. एखाद्या महिलेसोबत छेडछाड झाली, तर त्या माणसाला पकडा, आपल्यासोबत आणखी दोन-चार लोक येतील. जोवर, आपण घटनास्थळी जाऊन छेडछाड, बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखावे आणि बदडून काढावे, अशी आपली मानसिकता होणार नाही, तोवर हे गुन्हे थांबणार नाहीत."
"गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटते की नाही, हे माहित नाही. मात्र, जर १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा-मुलीचा कुणी विनयभंग केला, बलात्कार केला तर त्याला फाशीची शिक्षा आहे. तरीही असे गुन्हे थांबत नाहीत. असे प्रकार दररोज ऐकायला मिळतात. यावरून, गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही, असे दिसते. कायद्याची भीती वाटावी, यासाठी काय करायला हवे, आपण विचार करू शकता? कायदे अस्तित्वात असूनही अशा घटना का घडत आहेत, याबद्दल आपण सूचना देऊ शकता? यावर विचार व्हायला हवा," असेही हरीभाऊ बागडे यावेळी म्हणाले.