Mucormycosis : दिल्लीतील दोन रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसचा दुर्मीळ संसर्ग, चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 05:47 PM2021-05-22T17:47:57+5:302021-05-22T18:10:47+5:30

Mucormycosis : या केसमध्ये रुग्णांच्या अनेक बायोप्सीमध्ये ब्लॅक फंगसचे संक्रमण लहान आतड्यांमध्ये दिसून आले आहे.

rare cases of mucormycosis black fungs of small intestine seen at sir ganga ram hospital | Mucormycosis : दिल्लीतील दोन रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसचा दुर्मीळ संसर्ग, चिंता वाढली

Mucormycosis : दिल्लीतील दोन रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसचा दुर्मीळ संसर्ग, चिंता वाढली

Next
ठळक मुद्देब्लॅक फंगसचे अनेक रुग्ण समोर येत असल्यामुळे चिंता वाढली आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीनंतर आता आणखी एका आजाराने हाहाकार माजला आहे. या आजाराला बर्‍याच राज्यांत महामारी घोषित केली आहे. ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिस असे या आजाराचे नाव आहे. ब्लॅक फंगसचे अनेक रुग्ण समोर येत असल्यामुळे चिंता वाढली आहे. यातच आता ब्लॅक फंगसची एक धक्कादायक दुर्मीळ प्रकरण (रेअर केस) नवी दिल्ली गंगा राम रुग्णालयात नोंदविण्यात आली आहे. (rare cases of mucormycosis black fungs of small intestine seen at sir ganga ram hospital)

या केसमध्ये रुग्णांच्या अनेक बायोप्सीमध्ये ब्लॅक फंगसचे संक्रमण लहान आतड्यांमध्ये दिसून आले आहे. गंगा राम रुग्णालयात 56 ते 68 वर्षे वयोगटातील दोन रुग्णांच्या लहान आतड्यात हे संक्रमण असल्याचे आढळले. डायबेटीज असलेल्या दोन्ही रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती, परंतु त्यापैकी केवळ एकालाच स्टिरॉइड देण्यात आले होते.

दिल्लीत किती आढळले ब्लॅक फंगसचे रुग्ण?
बुधवारी रात्रीपर्यंत ब्लॅक फंगसचे एकूण 197 रुग्ण दिल्लीतील रुग्णालयांमध्ये दाखल असल्याचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी शुक्रवारी सांगितले होते. ते म्हणाले की, यामध्ये बाहेरील राज्यातून दिल्लीतील रूग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या रूग्णांचा समावेश आहे. बुधवारी रात्रीपर्यंत दिल्लीच्या रूग्णालयांत ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळले आहेत, ज्यात इतर राज्यांतून येथे उपचारासाठी आलेल्या रूग्णांचा समावेश आहे.

ब्लॅक फंगसचे पुण्यानंतर नागपुरात सर्वाधिक रुग्ण
राज्यात १८ मेपर्यंत या आजाराच्या ९५० रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, पुणे नंतर नागपूर विभागात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. पुणे विभागात २७३ तर नागपुरात २३३ सक्रिय रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. ब्लॅक फंगसच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

ब्लॅक फंगसच्या औषधांचा साठा उपलब्ध करा; सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र
देशात ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव वाढत आहे. या आजाराच्या औषध तुटवड्यावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्या, अशी मागणी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. केंद्र सरकारने केवळ राज्यांना ब्लॅक फंगसला महामारी रोग अधिनियम अंतर्गत महामारी म्हणून घोषित करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ आहे की, या आजाराच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचे पुरसे उत्पादन होईल आणि या औषधांचा पुरवठा देखील सुनिश्चित केला जाईल. उपचारासाठी रूग्णांना हे औषध मोफत उपलब्ध करून दिले जाईल, असे सोनिया गांधींनी म्हटले आहे. 

याचबरोबर, Liposomal Amphotericin-B म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक औषध आहे. बाजारात याचा तुटवडा आहे. त्यामुळे हे औषध मिळण्यासाठी तात्काळ पावले उचलण्यात यावी. तसेच, ब्लॅक फंगस या आजाराचा समावेश आयुष्यमान भारतसह इतर आरोग्य विमा योजनांमध्ये करावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे नरेंद्र मोदींना केली आहे.

महाराष्ट्रात ब्लॅक फंगसवरील खर्च आठ लाख !
महाराष्ट्र सरकारने महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेत या आजाराला समाविष्ट केले असून १ लाख ५० हजार, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत ५ लाख रुपये निश्चित केले आहेत. परंतु या आजारात विविध विषयांतील विशेषज्ञ, औषधोपचार, शस्त्रक्रिया व रुग्णालयातील वास्तव्याचा खर्चच किमान ८ लाखांवर जात असल्याने राज्य सरकारची ही मदत तोकडी पडत आहे. यामुळे जनआरोग्य योजनेत असलेल्या खासगी रुग्णालयांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Web Title: rare cases of mucormycosis black fungs of small intestine seen at sir ganga ram hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.